कोरोना रुग्णांना उपचार टाळल्यास कडक कारवाई; परिचारिकाही कायद्याच्या चौकटीत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

खासगी रुग्णालयातील जे डॉक्टर,नर्सेस व इतर कर्मचारी अत्यावश्यक सेवेत रुग्णांवर उपचार करण्यास नकार देतील,कर्तव्य बजावण्यात कसूर करतील ते मेस्मा कायद्यान्वये कारवाईस पात्र ठरतील.

पुणे - पुण्याच्या इतिहासात प्रथमच खासगी रुग्णालयांमधील डॉक्टर आणि परिचारिकांनाही ‘मेस्मा’ (महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा २००६) कायदा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचारास नकार देणाऱ्या तसेच, वैद्यकीय सेवेसाठी हजर नसलेल्या डॉक्टर आणि परिचारिकांविरोधात कारवाई करण्याचे अधिकार प्रशासनाला मिळाले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्यात वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे ससून रुग्णालय, आरोग्य खात्याचे औंध येथील जिल्हा रुग्णालय, महापालिकेच्या डॉ. नायडूसह इतर सर्व रुग्णालयांमध्ये कोरोना संसर्गाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र, रुग्णांची संख्या वाढत असल्याने या रुग्णालयांवरील ताण सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयांची मदत घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

शहरातील ७०१ खासगी रुग्णालयांमधील ८० टक्के खाटा टप्प्याटप्प्याने आरक्षित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यात ३० ते ५०० बेड क्षमतेच्या रुग्णालयाचा समावेश आहे. आता या रुग्णालयांमधील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणे डॉक्टर आणि नर्सना बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी आतापर्यंत फक्त सरकारी डॉक्टर आणि परिचारिकांसाठी वापरण्यात येणारा मेस्मा कायदा खासगी डॉक्टरांनाही प्रथमच लागू करण्यात आला आहे. याबाबत महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी जारी केलेल्या परिपत्रकातील दुसऱ्या क्रमांकाच्या मुद्यात स्पष्ट केले आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खासगी रुग्णालयातील जे डॉक्टर, नर्सेस व इतर कर्मचारी अत्यावश्यक सेवेत रुग्णांवर उपचार करण्यास नकार देतील, कामावर हजर रहाणार नाहीत, आपले कर्तव्य बजावण्यात कसूर करतील ते मेस्मा कायद्यान्वये कारवाईस पात्र ठरतील, असे गायकवाड यांनी आदेशात नमूद केले आहे. 

दृष्टीक्षेप खासगी वैद्यकीय सेवेवर 

७०१ -नोंद असलेली रुग्णालये 
१५,८८७  - एकूण खाटा 
४३२  - एक ते दहा खाटा असलेली
२,१७८ - या रुग्णालयांतील एकूण खाटा 

चारच रुग्णालयांत पाचशेवर खाटा 
महापालिकेती नोंदीनुसार शहरात पाचशेपेक्षा जास्त खाटांची क्षमता असलेली फक्त चारच रुग्णालये आहेत. त्यात भारती हॉस्पिटल (८३१ खाटा), दीनानाथ मंगेशकर रुग्णालय (८१२), केईएम (५६८) आणि रुबी हॉल क्लिनिक (५५३) या रुग्णालयांमधून २ हजार 764 खाटा उपलब्ध आहेत. 

खाटांनिहाय रुग्णालयांची संख्या 

खाटा ........................... रुग्णालयांची संख्या 
११ ते ३० .............................. १८१ 
३१ ते ५० ............................... ३१ 
५१ ते १०० ............................. २९ 
१०१ ते ३०० ........................... २१ 
३०१ ते ५०० ........................... ३ 
५०० पेक्षा जास्त ...................... ४ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: take action doctors & nurses who refuse to treat patients infected with corona