''आंबेगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे सर्वेक्षण करून कारवाई करा''

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 November 2020

आंबेगाव बुद्रूक सर्व्हे नं. 50 मधील 40 गुंठे आरक्षित जागेवर 100 टन क्षमतेचा हा कचरा प्रक्रिया प्रकल्प बेकायदेशीरपणे उभारण्यात आल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. प्रकल्पाचा त्रास होत असल्याने काही नागरिकांनी 1 नोव्हेंबर रोजी तो पेटवून दिला होता. प्रकल्प इतरत्र हलवावा या मागणीसाठी व तो बेकायदेशीर असल्याचा दावा करीत स्थानिकांनी ऍड. सौरभ कुलकर्णी यांच्यामार्फत एनजीटीमध्ये दावा दाखल केला आहे.

पुणे : कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेडून आंबेगाव ब्रुद्रुक येथे उभारण्यात आलेल्या प्रकल्पाचे सर्वेक्षण करून गरज पडल्यास त्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, असे आदेश येथील राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) केंद्रीय (सीपीसीबी) व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यासाठी तिघांची संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे. एनजीटीने दिलेल्या आदेशामुळे महापालिकेच्या अडचणीत वाढ झाली असून स्थानिक नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्‍यता आहे.

आंबेगाव बुद्रूक सर्व्हे नं. 50 मधील 40 गुंठे आरक्षित जागेवर 100 टन क्षमतेचा हा कचरा प्रक्रिया प्रकल्प बेकायदेशीरपणे उभारण्यात आल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. प्रकल्पाचा त्रास होत असल्याने काही नागरिकांनी 1 नोव्हेंबर रोजी तो पेटवून दिला होता. प्रकल्प इतरत्र हलवावा या मागणीसाठी व तो बेकायदेशीर असल्याचा दावा करीत स्थानिकांनी ऍड. सौरभ कुलकर्णी यांच्यामार्फत एनजीटीमध्ये दावा दाखल केला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

केंद्रीय व राज्य पर्यावरण मंत्रालय, केंद्रीय व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी आणि पुणे महानगर पालिकेला त्यात प्रतिवादी करण्यात आले आहे. याबाबत झालेल्या सुनावणीत एनजीटीने प्रशासनाला सर्वेक्षण करून योग्य त्या कारवाईचे आदेश एनजीटीचे अध्यक्ष न्यायमूर्ती आदर्शकुमार गोयल, न्यायिक सदस्य शेवोकुमार सिंह, तज्ज्ञ सदस्य सत्यवानसिंह गर्भवाल आणि नागीण नंदा यांच्या खंडपीठाने दिले. कारवाई झाल्यानंतर पुढील तारखेच्या आधी त्याचा अहवाल एनजीटीत सादर करावा, असेही आदेशात नमूद आहे. या बाबत पुढील सुनावणी 24 मार्च 2021 रोजी होणार आहे.

पालिकेकडे परवानगी नाही 
कचरा प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेने योग्य त्या यंत्रणेच्या परवानग्या घेतल्या नाहीत, असे आमच्या हाती आलेल्या कागदपत्रांनुसार स्पष्ट झाले आहे. प्रकल्पाजवळ जाण्यासाठी चांगला रस्ता देखील नाही. आग लागल्यानंतर तेथे गॅस चेंबरसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांना मोठा सहन करावा लागत असून त्यातून त्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रकल्प इतरत्र हलवावा, असा युक्तिवाद ऍड. कुलकर्णी यांनी केला.

 पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

निसर्गाचा ऱ्हास; नागरिकांना त्रास ः
या प्रकल्पामुळे आंबेगावचे वातावरण दूषित होऊन जांभूळवाडी तलाव, नैसर्गिक स्वच्छ पाण्याचे स्रोत, बोरिंग आणि विहिरीचे पाणी दूषित होऊन निसर्गाचा ऱ्हास होत आहेत. अनेक लहान लहान बैठी घरे व उंच सोसायट्यांमधील नागरिकांना गेल्या कित्येक दिवसापासून दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या कचरा प्रकल्पामध्ये येवलेवाडी, कोंढवा, बिबवेवाडी, सिंहगड रस्ता, धनकवडी आदी परिसरातून कचरा आणला जात असल्याने आंबेगाव बुद्रूक आंबेगाव खुर्द व जांभूळवाडी येथील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.

प्रकल्प बंदही होऊ शकतो?ः
समिती केलेल्या पाहणीत महापालिका दोषी आढळली तर प्रकल्प बंद करण्याचे आदेश देण्याचे अधिकार एमपीसीबीला आहेत. तसे झाल्यास प्रकल्प पूर्णतः बंद होऊ शकतो. तसेच तो इतरत्र देखील हलवला जाऊ शकतो, अशी माहिती ऍड. कुलकर्णी यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take action by surveying the waste processing project at Ambegaon