esakal | दिवाळीत भरपूर फराळ खा, तरीही राहा फिट! 
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळीत भरपूर फराळ खा, तरीही राहा फिट! 

दिवाळीचा सण जसा प्रकाशाचा, दिव्यांचा, झगमगाटाचा असतो, तसाच तो गोडधोड खाण्याचाही असतो. सध्या दिवाळीमुळे घरोघरी खमंग फराळाने डब्बे भरले आहेत. त्यावर मस्तपैकी तावही मारला जातोय.

दिवाळीत भरपूर फराळ खा, तरीही राहा फिट! 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे  ""दिवाळीत भरपूर फराळ खाणे होते. त्यामुळे दिवाळीनंतर वजन जवळपास दीड-दोन किलोने वाढल्याचा गेल्या वर्षीचा अनुभव आहे. त्यामुळे यंदा फराळाच्या जोडीला भरपूर व्यायामही करत आहे. दिवाळीच्या निमित्ताने फिटनेसही सांभाळत असल्याने सणाचा आनंद द्विगुणित होत आहे,'' असे आयटी क्षेत्रात कार्यरत असणारे किरण के. यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिवाळीचा सण जसा प्रकाशाचा, दिव्यांचा, झगमगाटाचा असतो, तसाच तो गोडधोड खाण्याचाही असतो. सध्या दिवाळीमुळे घरोघरी खमंग फराळाने डब्बे भरले आहेत. त्यावर मस्तपैकी तावही मारला जातोय; परंतु किरण यांच्याप्रमाणेच आज अनेक तरुणतरुणी आरोग्याबाबत जागरूक झाल्याचे निदर्शनास येत आहे. दिवाळीत हवीहवीशी थंडी सोबतीला असली की चांगली भूकही लागते आणि भरपूर खाणे देखील होते. त्यामुळे फराळावर यथेच्छ ताव मारला जातो. मात्र आता घरामध्ये फराळाबरोबरच व्यायामालाही महत्त्व दिले जात आहे. त्यासाठी सकाळी चालणे, योगासने करणे, सूर्यनमस्कार घालणे असे काही फिटनेसचे पर्याय स्वीकारले जात आहेत. यात केवळ तरुणच नव्हे, तर मध्यमवयीन नागरिकांचा सहभाग असल्याचे दिसून येते. घरच्या घरी केलेल्या फराळावर ताव मारायला हरकत नाही, असा सल्ला आहारतज्ज्ञ देत आहेत. 
आहारज्ज्ज्ञ डॉ. विभूषा जांभेकर म्हणाल्या, ""एका वेळी भरपूर खाण्यापेक्षा ठराविक अंतराने खाणे योग्य आहे. तसेच फराळ बनवितानाच साखरेचा अतिरिक्त वापर टाळणे, साखरेऐवजी गुळाचा वापर उपयुक्त ठरेल. दुपारी जेवण जास्त झाल्यास रात्री लाइट खाणे उत्तम पर्याय आहे. फराळाला व्यायामाची जोड दिल्यास आरोग्याला निश्‍चितच फायदा होईल. व्यायामासाठी घराबाहेर पडणे शक्‍य नसल्यास घरात देखील व्यायाम करणे शक्‍य आहे.'' 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

निरोगी आरोग्यासाठी हे करा 
- नियमितपणे चालणे सुरू ठेवा 
- योगासने करण्यावर भर द्या 
- इमारतीच्या पायऱ्या चढणे-उतरणे 
- तुम्हाला शक्‍य तो व्यायाम करा 
- व्यायामात सातत्य असू द्या