नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक खबरदारी घ्या : अजित पवार   

अनिल सावळे
Friday, 8 January 2021

'कोरोना व्यवस्थापना’बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी येथील विधानभवन सभागृहात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली.

पुणे : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर गाफील राहून चालणार नाही. परदेशातून आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर लक्ष ठेवावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'कोरोना व्यवस्थापना’बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी येथील विधानभवन सभागृहात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे ऑनलाईन तर सभागृहात खासदार गिरीष बापट, आमदार माधुरी मिसाळ, चेतन तुपे, सुनिल टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे यांच्यासह विभागीय आयुक्त सौरभ राव, ससून रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी एस.चोक्कलिंगम, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंके, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, जिल्हा टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. डी. बी. कदम आदी या वेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यात सर्वच यंत्रणांचे प्रयत्न सुरू आहेत. नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवरही अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या. परदेशातून प्रवास करून आलेल्या नागरिकांची तपासणी करून त्यांच्यावर लक्ष ठेवा. नागरिकांनी मास्कचा वापर, सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे आहे. तसेच, सामूहिक कार्यक्रमांमध्ये नियमांचे पालन करावे. सरकारने काही प्रमाणात शिथिलता दिली असली तरी कोरोना अजूनही गेलेला नाही. त्यामुळे नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

तब्बल नऊ महिन्यानंतर महाविद्यालये होणार सुरु

उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी कोरोना व्यवस्थापनासंदर्भात प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त केले. बापट यांनी रुग्णवाहिकेची उपलब्धता, ससून रुग्णालयाचे सुरू असलेले काम आदी विषय मांडले. विभागीय आयुक्त राव यांनी रुग्णोपचार व्यवस्थापन, प्रयोगशाळा तपासणी, परदेशातून प्रवास करून आलेल्या नागरिकांबाबत कार्यवाही, लसीकरण पूर्वतयारी उपाययोजनांबाबत माहिती दिली. तर, जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात असल्याचे सांगितले.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take extra precautions against the new corona virus says Ajit Pawar