esakal | ‘सोमेश्वर’ सांभाळणे येरागबाळ्याचे काम नव्हे
sakal

बोलून बातमी शोधा

अजित पवार

‘सोमेश्वर’ सांभाळणे येरागबाळ्याचे काम नव्हे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोमेश्वरनगर : ‘‘हौसे-नवसे विरोधात कमकुवत पॅनेल टाकणार आहेत म्हणतात. पण सोमेश्वर कारखान्याचा डोलारा सांभाळणे येरागबाळ्याचे काम नाही. आपल्याला विस्तारीकरण करणे, जादा उसाची विल्हेवाट लावणे, चांगला भाव देणे ही कामे करायची आहेत. त्यामुळे उमेदवारी मिळाली नाही, तरी रूसू नका. मी कुणालाही फोन करणार नाही. हे माझ्या-तुमच्या घरचे लग्न नाही. प्रपंचाची लढाई आहे, या भावनेतून काम करा.

साहेब, मी आणि सुप्रिया सुळे विकासकामात कसूर करणार नाही,’’ असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. बारामती येथे सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीनिमित्त आयोजित केलेल्या सोमेश्वर विकास पॅनेलच्या मेळाव्यात ते बोलत होते. आमदार संजय जगताप, पुरुषोत्तम जगताप, बाळासाहेब तावरे, प्रशांत काटे, पोर्णिमा तावरे, नीता फरांदे, संभाजी होळकर, माणिक झेंडे, प्रदीप पोमण, अशोक टेकवडे, प्रमोद काकडे, राजवर्धन शिंदे आदी या वेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘काहींना थांबावे लागणार आहे, तरीही कुठलीही नाराजी नको. आम्ही तिघांनी तुमच्यासाठी काम केले आहे आणि उद्याही करणार आहोत. काहींना पुढील निवडणुकांमध्ये संधी आहे. त्यामुळे चांगला भाव मिळविण्यासाठी आपल्या पॅनेलला मदत करा. तीन आकडी मतदारांच्या गावात उमेदवारांचा विचार होईल. जिराईत भाग, खंडाळा आणि पुरंदरलाही प्रतिनिधित्व मिळेल. रविवारी (ता. ३) संध्याकाळी पॅनेल जाहीर केले जाईल.

कर्मयोगी कारखान्याला पॅनेल उभा न करणे हा आमचा अधिकार आहे. सगळीकडे नाक खुपसले पाहिजे असे नाही. सोमेश्वरला तर एकतीसशे भाव दिला, तरीही विरोध होतोय. ज्या बूथवर आपल्याला झटका बसेल, तिथे मी पण झटका देणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

खैरे यांच्यावर टीका

दुष्काळात ऊस जळत होता तेव्हा विरोधी लोकांनी त्यांच्या गटाच्या कारखान्यांना ऊस का नेला नाही? मार्केट कमिटीला त्यांनी काय दिवा लावलाय तुम्हाला माहीत नाही. मी काही करायचे ठरवले, तर त्याचे मन त्यांना खाईल, अशी टीका अजित पवार यांनी पुणे बाजार समितीचे माजी मुख्य प्रशासक दिलीप खैरे यांचे नाव न घेता केली. तसेच समोरच्या बाजूच्या एक-दोघांनी माझ्याशी संपर्क साधलाय. काही चांगले निष्पन्न होतेय का याचाही प्रयत्न आहे. पण मर्यादित स्वरूपात ते शक्य आहे; अन्यथा नाही. माझीच एकवीस नावे काढणे जिकिरीचे झाल्याचेही ते म्हणाले.

loading image
go to top