पाचगणी : तळदेवच्या आखाड्यात ''हायव्होल्टेज'' लढती ; मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात मकरंद आबांची प्रतिष्ठा पणाला!

पाचगणी : तळदेवच्या आखाड्यात ''हायव्होल्टेज'' लढती ; मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात मकरंद आबांची प्रतिष्ठा पणाला!

Published on

उपमुख्यमंत्र्यांच्या होम पिचवर काटे की टक्कर

तळदेवच्या गटात शिवसेना- राष्ट्रवादीच्या संघर्षात भाजप आणि ‘उबाठा’ची एन्ट्री!


रविकांत बेलोशे ः सकाळ वृत्तसेवा

पाचगणी, ता. २५ : थंड हवेचे ठिकाण म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर तालुक्यात आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विशेषतः तळदेव गट, जो राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जन्मभूमी म्हणून ओळखला जातो, तिथे यंदा काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. (कै.) बाळासाहेब भिलारे यांचा बालेकिल्ला असलेल्या या भागात गेल्या निवडणुकीतच मोठे आव्हान निर्माण झाले. राष्ट्रवादीमधील अंतर्गत नाराजीने शिवसेनेला मदत करीत दोन जागा सेनेला बहाल केल्या. आता समीकरणे पूर्णपणे बदलली असून, राष्ट्रवादी आपला गड पुन्हा मिळवण्यासाठी सज्ज आहे आणि शिवसेना आता उरलीसुरली जागा ही मिळवून आपली सत्ता पुन्हा कायम राखण्यासाठी तयारीला लागली आहे.
तळदेव जिल्हा परिषद गटात शिवसेनेकडून (शिंदे) अजित सपकाळ यांनी राष्ट्रवादीला मोठे आव्हान दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी सभापती संजय गायकवाड यांनी जिंकण्याचा इरादा पक्का केला असून, आपली पूर्ण ताकद यासाठी कामाला लावली आहे; पण राष्ट्रवादीने डावलल्याने सुभाष सोंडकर यांनी मात्र नाराजी व्यक्त करीत थेट भाजपमधून तिकीट मिळवली आहे, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून अभिषेक शिंदे यांनी जनतेकडे कौल मागितल्याने ही लढत चौरंगी पण अटीतटीची होणार आहे.
कुंभरोशी पंचायत समिती गण हा गतवर्षी शिवसेनेने राष्ट्रवादीकडून हिसकावून घेतला होता. त्यामुळे आता राष्ट्रवादीने पुन्हा वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आपली ताकद पणाला लावली आहे. यावेळी शिवसेनेकडून संजय मोरे यांनी समीर चव्हाण यांच्यावर मात करीत पक्षाकडून तिकीट मिळवले खरे; पण दोघांच्यात असलेले मतभेद चव्हाट्यावर आले. मोरे यांचे उमेदवारीवर चव्हाण यांनी आक्षेप घेतला; पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मोरे यांचे बाजूने निकाल दिल्याने संतप्त झालेले चव्हाण यांनी मात्र उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीकडून सचिन उतेकर यांनी प्रचाराचा धुरळा उडवत आपण मंत्री मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे यांच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांच्या जोरावर झंझावात निर्माण केला आहे. भाजपकडून सुरेश जाधव यांनी आव्हान उभे केले आहे. यामध्ये समीर चव्हाण यांनी बंडखोरी करून आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्यास राष्ट्रवादीला ही निवडणूक सोपी ठरणार आहे. त्यामुळे या ठिकाणी ही चौरंगी लढत होऊन मोठा संघर्ष पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या तळदेव गणात गतवेळी राष्ट्रवादीची सत्ता होती. यावेळीही या गणात राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी रस्सीखेच निर्माण झाली होती. सागर कदम यांनी तिकिटासाठी मोठी ताकद पणाला लावली होती; पण त्यात संजय उतेकर यांनी बाजी मारली आणि तिकीट मिळवली. त्यांचे विरोधात शिवसेनेचे जुने कट्टर कार्यकर्ते संजय शेलार यांनी आव्हान निर्माण केले आहे, तर भाजपनेही गोविंद संकपाळ यांना तिकीट दिले असून, शिवसेनेकडून (उबाठा) अभिजित शिंदे यांनी गट आणि गणात आपला कौल मागितला आहे. त्यामुळे सरळ होणाऱ्या या लढतीत राष्ट्रवादीला सुकर असणारे वातावरण ही पक्षातीलच नाराजांची मनधरणी करून एकसंध ठेवल्यास निवडणूक सोपी जाणार आहे.
या निवडणुकीत मंत्री मकरंद पाटील आणि जिल्हा बँक संचालक राजेंद्र राजपुरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राष्ट्रवादीकडे इच्छुकांची मोठी फळी असली, तरी माजी आमदार दगडूदादा सकपाळ यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने या गटात शिवसेनेची ताकद दुपटीने वाढली आहे. तळदेव गट हा दुर्गम डोंगर कपारीतील आहे. कोयना, सोळशी आणि कांदाटी या तीन नद्यांच्या खोऱ्यात वसलेला असल्याने उमेदवारांना डोंगरदऱ्यांतून प्रचाराचा डोंगर पार करावा लागणार आहे. गावागावांत जाण्यासाठी आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहे. यात जो यशस्वी होणार तोच निवडणुकीत बाजी मारणार असे चित्र सध्यातरी दिसत आहे. येथे शिवसेनेची भिस्त संजय मोरे
यांच्यावर आहे, तर राष्ट्रवादीची भिस्त ज्येष्ठ नेते बाबूराव संकपाळ यांच्यावर आहे. ऐकूनच या ठिकाणी राष्ट्रवादी आणि शिवसेनेतच सरळ सरळ लढत होणार असून, नाराजी नाट्यावर दोन्ही पक्ष काय भूमिका घेणार हे पाहणे गरजेचे वाटत आहे. त्यावरच सर्व विजयाची गणिते सुटणार आहेत.

चौकट
उपमुख्यमंत्र्यांचे गाव विरुद्ध मकरंद पाटील यांचे काम...
यंदाची निवडणूक ही केवळ व्यक्तींची नसून ती ‘प्रतिष्ठेची’ आहे. एका बाजूला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वलय आहे, तर दुसऱ्या बाजूला मंत्री मकरंद पाटील यांनी केलेले जमिनीवरचे काम आहे. या दोघांच्या संघर्षात कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे डोळे लागले आहेत.‘निवडणुका येतात आणि जातात; पण आम्ही वर्षभर जनतेच्या सुख-दु:खात धावून गेलो आहोत. मकरंद पाटील यांनी या दुर्गम भागात केवळ आश्वासने दिली नाहीत, तर रस्ते आणि पुलांची कामे मार्गी लावून विकासाचा डोंगर उभा केला आहे. हीच शिदोरी आम्हाला विजयाकडे घेऊन जाईल, असा विश्वास राष्ट्रवादीच्या गोटातून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com