
पुणे : पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीच्या उत्तरेतील उपनगर तळवडेगावच्या हद्दीत इंद्रायणी नदीच्या कुशीत ‘तळवडे सॉफ्टवेअर इन्फोटेक पार्क’ वसले आहे. साधारण सात मोठ्या नामांकित कंपन्या आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) कार्यालय आहे. वाहनतळ सुविधा प्रशस्त असली तरी कनेक्टिव्हिटीसाठी प्रशस्त रस्त्यांचा अभाव, अरुंद रस्त्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे-आडवे चर, विविध विकासकामांसाठी केलेली, पण तात्पुरत्या स्वरूपात बुजवलेली खोदकामे, भटक्या कुत्र्यांचा उपद्रव, बहुतांश वेळा बंद असणारे पथदिवे, सार्वजनिक वाहतूक सुविधेचा अभाव, महाळुंगे व चाकण औद्योगिक परिसरामुळे अरुंद रस्त्यांवरून वाढलेली अवजड वाहतूक आदी समस्यांनी ‘तळवडे आयटी’ला ग्रासले आहे.