स्वतःचा ट्रेंड बदलून तरुणांचे आकर्षण ठरतोय तमाशा
चाकण, ता. १६ : एक पारंपरिक लोककला म्हणून ओळखला जाणारा तमाशा हा काळाच्या ओघात बदलत असून नव्या पिढीला आकर्षित करत आहे. पूर्वी ग्रामीण भागापुरता मर्यादित असलेला तमाशा आता शहरी रंगभूमी, महोत्सव, महाविद्यालयीन कार्यक्रम आणि डिजिटल माध्यमांवरही दिसून येत आहे. परंपरा जपत आधुनिकतेची कास धरल्यामुळे तमाशाचा ट्रेंड बदलत असल्याचे चित्र आहे.
पूर्वी तमाशाकडे केवळ करमणुकीचे साधन म्हणून पाहिले जात होते. आजच्या तरुण कलाकारांनी तमाशामध्ये आशयपूर्ण विषय, सामाजिक प्रश्न, विनोद, आधुनिक संगीत, नवी नृत्यशैली, हिंदी-मराठी चित्रपटातील गाणी, लोकगीते, लावण्या यांचा समावेश केल्यामुळे तमाशा नव्या रूपात आला आहे. लावणी, सोंगाड्या, पोवाडा, शाहिरी, गणगौळण या पारंपरिक घटकांबरोबर आधुनिक प्रकाशयोजना, ध्वनी व्यवस्था, नेपथ्य तमाशात वापरले जात असल्याने तमाशा भव्य व प्रभावी ठरत आहे.
तमाशात सहभागी होणाऱ्या कलाकारांमध्येही बदल जाणवतो आहे. पूर्वी ही कला पिढीजात कलाकारांपुरतीच मर्यादित होती. मात्र, आता उच्च शिक्षण घेतलेले, नाटक व नृत्याचे प्रशिक्षण घेतलेले तरुण कलाकार तमाशाकडे वळताना दिसतात. काही तरुणीही आत्मविश्वासाने लावणी सादर करीत असून तमाशातील महिलांची भूमिका अधिक सक्षम होत आहे.
तमाशाच्या वगनाट्य कथानकांमध्येही सामाजिक भान दिसून येते. शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, स्त्री-पुरुष समानता, व्यसनाधीनता, राजकीय विडंबन अशा विषयांवर भाष्य केले जाते. यामुळे तमाशा केवळ करमणूक न राहता समाजप्रबोधनाचे माध्यम बनले आहे. ज्येष्ठ कलाकार नव्या पिढीला मार्गदर्शन करीत असून पारंपरिक ढोलकी, संवादशैली, लोकभाषेचे महत्त्व अधोरेखित केले जात आहे. त्यामुळे तमाशाची ओळख अबाधित राहून तो आधुनिक काळाशी जुळवून घेत आहे. तमाशाचा बदलता ट्रेंड ही सकारात्मक बाब आहे. या कलेकडे तरुण वळाल्याने तमाशा नव्या दमाने पुढची वाटचाल करताना राज्यात दिसतो आहे.
समाज माध्यमांचा मोठा प्रभाव
तरुण प्रेक्षकांचा तमाशाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे. समाज माध्यमांवर तमाशातील लावणीचे, हिंदी-मराठी गीतांचे, नृत्याचे व्हिडिओ, कलाकारांचे रील्स, मंचामागील किस्से मोठ्या प्रमाणावर सध्या व्हायरल होत आहेत. यामुळे तमाशा केवळ प्रत्यक्ष कार्यक्रमापुरता न राहता डिजिटल व्यासपीठावरही लोकप्रिय होत आहे. यूट्युब, इन्स्टाग्राम, फेसबुकसारख्या माध्यमांमुळे तरुण पिढी तमाशाशी अधिक जवळीक साधत आहे.

