

वाढीव विद्युतीकरणासाठी ‘रास्ता रोको’चा इशारा
धनंजय ताटे यांचे निवेदन; तीन वर्षांपासून रखडले काम, पावसाळ्यापूर्वीचा अल्टिमेटम
कऱ्हाड, ता. २० ः तांबवे (ता. कऱ्हाड) येथील वाढीव वस्ती विद्युतीकरणाचे काम गेली दोन वर्षे रखडले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. संबंधित काम तातडीने सुरू न झाल्यास २८ मे रोजी तांबवे फाटा- साकुर्डी पेठ येथे कऱ्हाड-पाटण- चिपळूण महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य धनंजय ताटे व सहकाऱ्यांनी दिला आहे. त्याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी, पोलिस अधिकारी यांना देण्यात आले.
माजी सरपंच विठोबा पवार, ग्रामपंचायत सदस्य अमर गुरव, राजेंद्र पाटील यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनातील माहिती अशी ः येथील वाढीव वस्ती विद्युतीकरणाचे काम ३१ मार्च २०२३ रोजी एका कंपनीला टेंडरद्वारे देण्यात आले होते. मात्र, मंजूर नकाशे आणि आराखडे हे पूर्वीच्या ग्रामपंचायत काळातील असल्याने हे काम दोन वर्षे थांबवण्यात आले. जिल्हा परिषद निवडणुका झाल्यानंतर ग्रामस्थांनी कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंत्यांकडे वारंवार पाठपुरावा केला. त्यासंदर्भात माध्यमांतून आवाज उठवल्यानंतर १५ एप्रिलला साहित्य जागेवर पोहोच करून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली. मात्र एक-दोन दिवस काम करून ते पुन्हा बंद करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
कामाबाबत वारंवार विचारणा करूनही महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. संबंधित वाढीव वस्त्या डोंगरी भागात असून, परिसरात बिबट्यांसह जंगली प्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे. अनेक वेळा शेळ्या-मेंढ्या व इतर पाळीव जनावरांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी, तसेच पाळीव जनावरांच्या संरक्षणासाठी वाड्या-वस्त्यांमध्ये वीज व उजेडाची अत्यंत गरज असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे.
सध्या मे महिना सुरू असून, पुढील चार महिने पावसाळा असल्याने आताच काम पूर्ण झाले नाही, तर पुन्हा मोठा विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून हे काम युद्धपातळीवर सुरू न झाल्यास २८ मे रोजी सकाळी ११ वाजता तांबवे फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
-------------------------------------
20747
कऱ्हाड ः प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देताना धनंजय ताटे, विठोबा पवार, अमर गुरव, राजेंद्र पाटील, अमित पाटील आदी.
-----------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.