ढेबेवाडी सुधारित ढेबेवाडीच्या डोंगरपट्ट्यात '' तारा'' चीच चर्चा
ढेबेवाडीच्या डोंगरपट्ट्यात ‘तारा’चीच चर्चा
निवी- कसणीसह शेवताई मंदिर परिसरात वावर; नागरिकांत दहशत, वन्यजीवचे पथक यंत्रणेसह मागावर
ढेबेवाडी, ता. ३० : ताडोबातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थानांतर केलेली तारा वाघीण अजूनही निवी- कसणीसह शेवताई मंदिर परिसरातच फिरत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. तिने लोकवस्ती नसलेल्या जंगल परिसरात जावे व तिथेच राहावे, यासाठी वन्यजीव विभागाकडून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. ताराच्या गळ्यात कॉलर रेडिओ असल्याने तिच्या हालचाली वन्यजीवच्या पथकाला समजत आहेत.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडलेली तारा वाघीण चांदोली धरणाचा जलाशय पोहून पार करत काही दिवसांपूर्वीच लगतच्याच ढेबेवाडी खोऱ्यात पोचली आहे. या परिसरात तिचे पहिले दर्शन २४ तारखेला कसणी- घोटील दरम्यान झाले. सकाळी-सकाळी एसटी बसच्या समोरूनच ती रस्ता ओलांडताना प्रवाशांना दिसून आली. तेव्हापासून आजतागायत ती त्याच परिसरात फिरत आहे. काल कसणी जवळच्या निवी परिसरात तिचे लोकेशन वन्यजीवच्या पथकाला मिळाले. कसणीजवळच्या धनगरवाड्याच्या परिसरात ताराने एका रेडकाची शिकार केल्याची चर्चा आहे. डोंगर भागात शेतकऱ्यांनी चरायला सोडलेल्या पाळीव जनावरांना भक्ष्य बनवून त्याच परिसरात मुक्काम ठोकून राहू नये, लोकवस्ती नसलेल्या जंगल परिसरातच तिचे वास्तव्य राहावे, यासाठी वन्यजीव विभागाने कसणी, घोटील, निवी परिसरात जनजागृती सुरू केली आहे. काही दिवस जनावरे चरायला न सोडता त्यांना घरीच चारापाणी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. असे केल्याने तारा वाघीण लोकवस्तीकडे न येता वन्य प्राण्यांची मुबलकता असलेल्या निर्जन जंगल परिसरातच थांबेल, असा अंदाज आहे. डोंगर परिसरात सध्या गवत कापणीचा हंगाम सुरू आहे. आधीच बिबट्याची भीती असताना त्यात वाघिणीची भर पडल्याने शेतकरी समूहाने गवत कापणीसाठी शिवारात जात आहेत. शाळा गावापासून अंतरावर असल्याने विद्यार्थी व पालकातही भीतीचे वातावरण आहे.
-------------------------
(चौकट)
सूर्यास्तानंतर घराचे दरवाजे बंद...
विभागातील डोंगरभागात रानगवे, बिबट्या, डुक्करे आदी वन्य प्राण्यांचा
सतत उपद्रव जाणवतो. आता त्यामध्ये तारा वाघिनीच्या दहशतीची भर पडली आहे. डोंगर भागातील वाड्यावस्त्यातून शिक्षण, रोजगार, व्यवसाय, नोकरी व अन्य कामानिमित्ताने बाहेरगावी जाणारे रात्री अंधार पडण्यापूर्वी गावाकडे परतण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. लोक रात्री एकदा घरात गेले, की बंद केलेला दरवाजा सकाळी खडखडीत उजडेपर्यंत उघडत नसल्याचे दिसून येत आहे.
----------------------------------
(फोटो) 0793६
निवी : परिसरात तारा वाघिणीच्या संचार असल्याने वन्यजीवचे. पथक तिच्याबद्दल माहिती घेत आहे.
-------------------------------
राजेश पाटील......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

