सातारा तारळी पंप स्टोरेज प्रकल्प होऊ देणार नाही

सातारा तारळी पंप स्टोरेज प्रकल्प होऊ देणार नाही
Published on: 

तारळी पंप स्टोअरेज प्रकल्प
होऊ देणार नाही : डॉ. पाटणकर

ॲग्रोवन वृत्तसेवा
सातारा : विकासाच्या नावाखाली तारळी खोऱ्यातील शेती, पाणी आणि पर्यावरणाचा बळी दिला जाणार असेल, तर असा विकास आम्हाला मान्य नाही. अदानी कंपनीचा तारळी पंप स्टोअरेज प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी घेतला आहे.

प्रकल्पाच्या खर्चाबाबत शंभरपट तफावत दाखविल्याचा आरोप त्यांनी येथे आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत सोमवारी केले. डॉ. पाटणकर म्हणाले,‘‘तारळी पंप स्टोअरेज प्रकल्पाची प्रत्यक्ष किंमत ५,६७५ कोटी रुपये असताना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश तेलगू यांनी वन विभागाकडे ही किंमत केवळ ५६.७५ कोटी रुपये असल्याचे कळविले आहे. राज्य शासनालाही अशाच स्वरूपाची माहिती दिली आहे.’’

मानद वन्यजीव सदस्य रोहन भाटे यांनी ही बाब उघडकीस आणल्याचे सांगत या प्रकरणाची चौकशी करण्याची प्रक्रिया केंद्र सरकारच्या स्तरावर सुरू झाल्याचे त्यांनी म्हटले.

या प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या चार टक्के निधी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला देणे अपेक्षित होते.५,६७५ कोटींच्या खर्चानुसार ही रक्कम सुमारे २२७ कोटी रुपये होते. मात्र, प्रकल्पाच्या खर्चाबाबतच चुकीची माहिती दिली जात असल्याचा आरोप झाल्याने वन्यजीव संवर्धनासाठी मिळणाऱ्या निधीचे काय होणार? असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.

तारळी नदीच्या पाण्यावर स्थानिक शेतकऱ्यांचा हक्क आहे. कंपनीच्या पाणी वापरामुळे नदीकाठच्या लाभक्षेत्रात पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती आहे. तारळी कालव्याच्या माध्यमातून कऱ्हाड, कोरेगाव, माण, खटाव तालुक्यांतील शेतीला मिळणाऱ्या पाण्यावर परिणाम होऊ शकतो. उपसा सिंचन योजनांच्या लाभक्षेत्रालाही त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

---- चौकट ----
दंडात्मक कारवाई नको, प्रकल्पच बंद करा
सौरऊर्जा, पवनऊर्जा आणि बॅटरी स्टोअरेजसारखे पर्याय उपलब्ध असताना जंगल, वन्यजीव आणि स्थानिक जनजीवन धोक्यात घालणारे प्रकल्प कशासाठी, असा प्रश्‍न उपस्थित करत पाटणकर यांनी तारळी प्रकल्प तातडीने रद्द करावा, अशी पुन्हा एकदा मागणी करीत असल्याचे सांगत कंपनीवर केवळ दंडात्मक कारवाई करून चालणार नाही, तर प्रकल्पच बंद करावा, अशी ठाम भूमिका मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.