मिळकत नसताना पालिकेकडून तब्बल सात लाखांचा कर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 जानेवारी 2020

करसंकलन विभागाकडून पवार यांना कर लावण्यात आलेल्या गट. क्र. ८४८ मधील मिळकत कोणाच्या नावावर आहे, ते शोधावे लागेल. याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. मिळकत शोधल्यानंतर संबंधित मिळकतदाराला पवार यांनी करापोटी भरलेली रक्कम परत करण्याची विनंती करण्यात येईल.
- व्ही. के. कावरे, करसंकलन अधिकारी, चिखली

चिखली - मिळकत नावावर नसताना कुदळवाडीतील शेतकऱ्याकडून महापालिकेने तब्बल सात लाखांचा कर वसूल केला आहे. चिखली करसंकलन विभागाने केलेल्या फसवणुकीतून न्याय मिळावा अशी मागणी त्या शेतकऱ्याने केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या विभागात अनेकांना अधिक कर लावणे, एकाच्या नावावर असलेल्या मिळकतीचा कर दुसऱ्याच्या नावावर देणे, असे अनेक प्रकार उघड झाले आहेत. तसाच प्रकार पुन्हा कुदळवाडी येथील काळूराम पवार यांच्याबाबत घडला आहे. त्यांच्या नावावर (गट क्र. ७९३ मध्ये दोन, ६०२, ९४३ मध्ये एक) चार मिळकती आहेत. असे असताना चिखली करसंकलन विभागाकडून पवार यांची मिळकत नसलेल्या गट क्र. ८४८ मधील मिळकतीचा करही लावण्यात आला. पवार यांच्या नावावरील चार मिळकतींचा दहा लाख आणि नावावर नसलेल्या मिळकतीचा साडेसात लाख असा साडेसतरा लाख रुपये कर देण्याबाबत नोटीस दिली. दरवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक कर आल्याचे त्यांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सांगितले. तुमच्याच मिळकती कर असल्याने तो भरावा लागेल, असे उत्तर त्यांना मिळाले. पवार यांनी धनादेशाद्वारे तो कर भरलाही. त्यानंतर त्यांनी सातबारासह ८४८ मध्ये मिळकत नसल्याचे पुरावे सादर केले. मात्र, गेले सहा महिने फेऱ्या मारूनही या विभागाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tax of Rs 7 lakh from the municipality when there is no income