Sharad Pawar : कर लादण्याच्या प्रमाणाबाबत विचार व्हावा; शरद पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tax structure of Central Govt Consideration scale of taxation Sharad Pawar

Sharad Pawar : कर लादण्याच्या प्रमाणाबाबत विचार व्हावा; शरद पवार

बारामती : ‘‘करातून उत्पन्न मिळते ही बाब मान्य आहे, पण कर लादताना ते किती प्रमाणात लादावेत याचाही विचार होण्याची गरज आहे,’’ अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सध्याच्या केंद्र सरकारच्या कररचनेवर नाराजी व्यक्त केली. बारामती मर्चंटस असोसिएशनच्या बुधवारी (ता. २६) झालेल्या दिवाळी पाडव्याच्या कार्यक्रमात पवार यांच्या भाषणाचे आयोजन केले जाते. यात त्यांनी व्यापाऱ्यांनी जीएसटीबाबत नाराजी व्यक्त केल्याचा धागा पकडून कररचनेबद्दल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले.

पवार पुढे म्हणाले की, मनमोहनसिंग पंतप्रधान असताना जीएसटी लागू करण्याबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जी बैठक आयोजित केली गेली, त्यात जीएसटीवर सर्वाधिक हल्ला नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून चढविला होता. मात्र, आज त्यांची भूमिका ही वेगळी झालेली आहे, जीएसटीच्या माध्यमातून अधिक उत्पन्न मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, मात्र त्याचा परिणाम सर्वच व्यवसायांवर झालेला दिसत आहे. सोन्याच्या खरेदीवर ३८ टक्क्यांपर्यंत वाहनखरेदीवर ४० टक्क्यांपर्यंत कर लावला जातो. महाराष्ट्र ऑटोमोबॉईल हब आहे, या माध्यमातून रोजगारनिर्मिती तर होतेच पण त्याबरोबर अनेक लघुद्योगही चालतात, यामुळे हा कर या सर्वांवर परिणाम करणारा ठरत आहे, अशी चिंता पवार यांनी बोलून दाखवली.

दरम्यान, साखर कारखान्यांनी साखरेसोबत इथेनॉल व वीजनिर्मिती सुरू केल्याने अनेक कारखान्यांनी आता जिल्हा बँकाकडून कर्जे घेणे थांबविले असून ते स्वयंपूर्ण होत आहेत. ब्राझील व थायलंडमधील संकटाचा भारतीय साखर उद्योगाला चांगला फायदा मिळणार असून त्याने बाजारपेठेतही ऊर्जितावस्था येईल. खासदार सुप्रिया सुळे, सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, पौर्णिमा तावरे, जवाहर वाघोलीकर, अमोल वाडीकर, वालचंद संचेती, पोपटलाल ओस्तवाल, किशोर सराफ, सदाशिव सातव, जय पाटील, नीलेश भिंगे, सचिन सातव, नीलेश निंबळककर, यश संघवी, तेजपाल निंबळककर आदी मान्यवर उपस्थित होते. असेही पवार यांनी सांगितले. मर्चंटस असोसिएशनचे अध्यक्ष अमोल वाडीकर यांनी प्रास्ताविकात केले. अनिल सावळे पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

जर्मनी व अमेरिकेत आज काही कंपन्या संकटामुळे बंद पडलेल्या आहेत. ही संधी समजून आपण काहीतरी पावले उचलायला हवीत. भारतीय वंशाचे उद्योगपती इंग्लंडच्या पंतप्रधानपदापर्यंत मजल मारू शकत असेल तर आपण भारतीय काहीही करू शकतो. या जिद्दीने काम करणे गरजेचे आहे.

- शरद पवार, ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस