Teacher Day 2022 परंपरेला जोडणारे शिक्षण महत्त्वाचे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षण

Teacher Day 2022 : परंपरेला जोडणारे शिक्षण महत्त्वाचे!

नवे शैक्षणिक धोरण परंपरेशी सांगड घालत व्यावसायिकतेला, कौशल्याला प्राधान्य देणारे आहे. त्यातून देशाला जगाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. तीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विश्‍वगुरू ही संकल्पना आहे.

शिक्षक दिनाच्या शिक्षक बंधू भगिनींना मनःपूर्वक

शुभेच्छा. मी गेली चाळीस वर्षे शिक्षण क्षेत्रात

विविध भूमिकेत काम केले आहे. प्रत्येक

भूमिकेचा धर्म अत्यंत प्रभावीपणे निभावला आहे. प्रत्येक शिक्षकाने आपली भूमिका व्यवस्थित पार पाडल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपणास जे विश्वगुरू होण्याचे स्वप्न दाखवले आहे ते सहज प्रत्यक्षात उतरवू, याची मला खात्री आहे. भारताने विश्वगुरू बनण्याचा निश्चय केला आहे. पंतप्रधान मोदींनी २०१४पासून हा ध्यास घेतला आहे. विश्वगुरू बनायचे म्हणजे काय? हे समजून घेतले पाहिजे. देशावर अकराव्या-बाराव्या शतकापासून मोगलांसह विविध प्रकारची आक्रमणे झाली, त्यानंतर इंग्रजांनी गुलामगिरीत लोटले. भारत आपली शिक्षण व्यवस्था विसरला. लॉर्ड मेकॉले यांनी १८५७ मध्ये भारतीय शिक्षणाचे, जुने सर्व आयाम बदलून कारकुनी पद्धतीची शिक्षण व्यवस्था लादली. मेकॉलेने बनवलेली गुलाम बनवणारी शिक्षण व्यवस्था भारताचा गाभा बनली. गुलाम ही इंग्रजांची गरज होती; स्वतंत्र भारताची नाही. परंतु आता प्रचंड मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत.

विद्वान सर्वत्र पूज्यते

भारतात इंग्रज येण्याआधी आपल्याकडे गुरुकुल शिक्षण पद्धती होती. गुरूला अर्थात शिक्षकाला, आचार्य यांना प्रचंड मान होता. ‘स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते’ अशी आपली परंपरा आहे. राजापेक्षा विद्वानाला श्रेष्ठ मानणारा भारत आहे. वेद हा भारतीय संस्कृतीचा प्राचीन ग्रंथ. वेदांना अपौरूषेय म्हणतात. आपल्या गुरुकुल पद्धतीमध्ये ६४ कला शिकवल्या जात असत. ज्याला जे आवडते त्यांनी ते शिकावे, अशी पद्धती होती. सोदाहरण म्हणून आपण द्रोणाचार्यांच्या गुरुकुलाचे उदाहरण घेऊया! भीमाला धनुर्विद्या, अर्जुनाला गदायुद्ध शिकवण्याची आवश्यकता नव्हती. धर्माला, अर्थात युधिष्ठिराला धर्मशास्त्राचे ज्ञान शिकवले गेले

म्हणजेच ‘जो जे वांछील तो ते लाहो...’ अशी शिक्षण पद्धती होती. म्हणजे ज्याला जे आवडते त्याने ते शिकावे. शिक्षण व्यवस्था ज्ञान देणारी असावी आणि ते ज्ञान निसर्गाचे, जगणे सुंदर बनवणारे, संपन्न बनवणारे असावे असे भारतीय परंपरा सांगते. समाजातील सर्व घटकांना त्यांच्या कलानुसार, कौशल्यानुसार शिक्षण मिळावे, अशी ही परंपरा आहे. भारतीय शिक्षण हे जीवनपद्धती होती. योग, आयुर्वेद, गुरूकुल शिक्षण पद्धती, व्यापार, शस्त्रे, विविध कला-शास्त्रांचे शिक्षण दिले जायचे. आर्यभट्ट, कणाद, चाणक्य, चार्वाक, सुश्रुत, वराहमिहीर, लीलावती, भास्कराचार्य यांच्यासारखी पारंगत मंडळी; तसेच नालंदा, तक्षशिला अशी वैभवशाली विद्यापीठे ही अफाट शिक्षण परंपरा आपल्याकडे होती.

वैशिष्ट्यपूर्ण शैक्षणिक धोरण

राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० च्या निमित्ताने पहिल्यांदाच भारतीय प्राचीन परंपरेचा विचार शैक्षणिक धोरणात आला. गेली दोन वर्षे मोदी सरकार धोरणाच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील आहे. आपली वैभवशाली परंपरा समजावून सांगत आपला प्रगल्भ इतिहास मुलांना शिकवला पाहिजे. त्यातील उत्तम ते स्वीकारणे आणि काळाशी सुसंगत रचना करणे हा धोरणाचा उद्देश आहे. यासाठी शिक्षकांच्या भूमिका बदलाव्या लागतील. केवळ वर्गात जाऊन शिकवणे, ज्ञानाचे हस्तांतरण म्हणजे शिक्षण नव्हे; तर विद्यार्थ्याला ज्ञानाचा वापर करायला शिकवणे महत्त्वाचे आहे. अर्थात कौशल्याधिष्ठित शिक्षण पद्धती आणणे. विद्यार्थ्यांचा संशोधनाकडे कल वाढावा, यासाठी संशोधनाधिष्ठित शिक्षण पद्धती आणणे. ज्याला उद्योजकतेमध्ये आवड आहे त्यांनी व्यावसायिकता जपावी. कलेमध्ये आवड असणाऱ्यांनी कला जपावी. खेळ जमतो त्यांनी खेळातच भाग घ्यावा. आता मोदी सरकारच्या धोरणांमुळे खेळांमधील आपलं वर्चस्व वाढत आहे. सुवर्णपदकांची संख्या वाढत आहे.

परंपरा, आधुनिकतेची सांगड

चाकोरीबाहेरच्या शिक्षणावर आपल्याला भर द्यावा लागेल. केवळ पुस्तकी ज्ञान उपयोगी नाही, त्याला पारंपरिक ज्ञानाची जोड हवी. भारतीय परंपरांना उज्ज्वल दिवस आणावे लागतील. त्यांना अभ्यासक्रमात आणावे लागेल. जसे विविध प्रकारची कामे परंपरेने शिकली तरी त्याला आधुनिक आणि पूरक ज्ञानाची जोड द्यावी लागेल. केरळमधून आपल्याकडे आलेल्या पंक्चर काढणाऱ्याचा मुलगा पंक्चर काढण्यात वाकबगार असतो, अशा मुलाला पूरक मोटार रिवाइंडिंगचा अभ्यासक्रम शिकवला पाहिजे. परंपरेने खाद्यपदार्थ, मिठाई बनवणाऱ्याच्या मुलाला खाद्यपदार्थ बनवण्यात वाकबगार करायला लागेल. आदिवासींच्या परंपरागत ज्ञानालाही अभ्यासक्रमात आणावे लागेल. पारंपरिक ज्ञानाचा वापर हा विश्वगुरू होण्यासाठी उपयोगी ठरू शकतो, याची मला खात्री आहे. यासाठी शिक्षकांना मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण द्यावे लागेल. त्यांची भूमिका, मानसिकता बदलावी लागेल. यातूनच बहुआयामी अष्टावधानी नागरिक तयार होतील. आपल्याकडे शिक्षणामध्ये जे प्रचंड बदल होत आहेत ते आपण कसोशीने अमलात आणले पाहिजेत. ही अंमलबजावणी वेगाने करून विश्वगुरू होण्याकडे वाटचाल केली पाहिजे. शिक्षक दिनाच्या पुन्हा शुभेच्छा.

स्वातंत्र्यानंतरचे बदल

स्वातंत्र्यानंतर आपण संस्थात्मक व्यवस्थेची पायाभरणी केली. शिक्षणाचा संख्यात्मक विस्तार झाला. परदेशात शिकायला जाणारे वाढले.

परदेशातील कंपन्यांचे प्रमुख भारतीय आहेत, याचा अभिमानच! पण भारतीय कंपन्या जागतिक दर्जाच्या बनण्यासाठी शिक्षण हवे.

केवळ नोकरी नव्हे; तर जीवनकौशल्ये विकसित करणारे शिक्षण हवे.

विश्वगुरू व्यापक संकल्पना

भारतीय परंपरेत ज्ञान कधीच बंदिस्त नव्हते. अमर्याद ज्ञान खुले करणे ही भारतीय परंपरा. या अर्थाने भारत विश्वगुरू बनू शकतो.

केवळ पैसे मिळविण्यासाठी शिक्षण नसते. योगासारख्या शिक्षणाने आयुष्यभरासाठी आरोग्य सुधारते. असे शिक्षण जगाला देणे ही विश्वगुरूची परंपरा.

केवळ उपग्रह बनवणे हे शिक्षण नाही; तर ध्यानात विश्वाचे आकलन होणे ही भारतीय परंपरा. इथून पुढच्या काळामध्ये परदेशांच्या लढायांचा अभ्यास करण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लढाया, त्यांचे व्यवस्थापन याचे धडे आपल्याला द्यायला हवेत.

आपल्या नौदलाचा ध्वज बदलून त्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेचा अष्टकोन स्वीकारला गेला, यालाच शिक्षणाचे भारतीयकरण म्हणूया!

(लेखक नवीन शैक्षणिक धोरण टास्क फोर्सचे चेअरमन आहेत.)