

पवित्र पोर्टलवरील ३३२ गुरुजींना मिळणार गुरुवारी शाळा!
दिव्यांग, महिलांना प्रथम संधी; कन्व्हर्ट राउंडमधून १५० ते १६० जागा भरण्याची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १४ : पवित्र पोर्टलद्वारे जिल्ह्यासाठी निवड झालेल्या ३४९ उमेदवारांपैकी ३३२ उमेदवारांची कागदपत्र पडताळणी पूर्ण झाली असून, या नवनियुक्त शिक्षणसेवकांच्या शाळा वाटपासाठी गुरुवारी (ता. १७) समुपदेशन प्रक्रिया घेण्यात येणार आहे. जवाहरलाल नेहरू वसतिगृह येथे होणाऱ्या या समुपदेशनातून पात्र उमेदवारांना तालुका, गाव आणि शाळानिहाय नियुक्तीचे ठिकाण मिळणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांना पुढील आठवड्यापासून नवीन शिक्षक उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पवित्र पोर्टलद्वारे जिल्ह्यासाठी ३४९ उमेदवारांची निवड झाली होती. त्यापैकी २ व ३ सप्टेंबर रोजी कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. मात्र, १७ उमेदवार पडताळणीसाठी गैरहजर राहिले. त्यांना ७ सप्टेंबर रोजी अंतिम संधी देण्यात आली; तरीही ते उपस्थित न राहिल्याने त्यांची निवड व नियुक्ती रद्द करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. उर्वरित ३३२ मराठी माध्यमाच्या शिक्षणसेवकांसाठी १७ सप्टेंबर रोजी समुपदेशन होणार आहे. समुपदेशनात प्रथम दिव्यांग उमेदवारांना, त्यानंतर महिला उमेदवारांना संधी दिली जाईल. त्यानंतर सेवाज्येष्ठता व गुणवत्तेच्या आधारे पात्र उमेदवारांना उपलब्ध शाळा निवडण्याची संधी मिळणार आहे.
समांतर आरक्षणातील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने काही पदे अद्याप रिक्त आहेत. कन्व्हर्ट राउंडमधून सुमारे १५० ते १६० रिक्त जागा पुढील टप्प्यात भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिक्षक भरतीचा आणखी एक टप्पा लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. जिल्हा परिषद शाळांसह जिल्हा परिषदेंतर्गत खासगी प्राथमिक शाळा, नगरपालिका, महापालिका तसेच इतर विभागांतील शिक्षक पदांचाही या प्रक्रियेत समावेश आहे. पहिली ते पाचवी तसेच सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी शिक्षक उपलब्ध झाल्याने ग्रामीण भागातील शाळांमधील शिक्षकांची कमतरता काही प्रमाणात दूर होण्यास मदत होणार आहे.
कोट...
नवनियुक्त शिक्षकांमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना अनुभवी व नवीन शिक्षक उपलब्ध होतील. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासालाही चालना मिळेल. सर्व पात्र उमेदवारांना लवकर नियुक्तिपत्रे देण्यात यावीत.
- प्रशांत शिरगुर, राज्य उपाध्यक्ष
चौकट...
ठळक बाबी...
- पवित्र पोर्टलवरून निवड झालेले उमेदवार : ३४९
- कागदपत्र पडताळणी पूर्ण झालेले उमेदवार : ३३२
- पडताळणीस गैरहजर उमेदवार; निवड रद्द : १७
- शिक्षकांचे समुपदेशन : १७ सप्टेंबर
- कन्व्हर्ट राउंडमध्ये संभाव्य रिक्त जागा : १५० ते १६०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.