रहिमतपूर,अपशिंगे हायस्कूलमधील सहशिक्षक सयाजी माने यांच्या बदलीविरोधात ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचा रस्ता रोको

रहिमतपूर,अपशिंगे हायस्कूलमधील सहशिक्षक सयाजी माने यांच्या बदलीविरोधात ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचा रस्ता रोको

Published on

अपशिंगेत शिक्षक बदलीविरोधात रास्ता रोको

विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचे आंदोलन; शैक्षणिक गुणवत्तेवर परिणामाची भीती

रहिमतपूर, ता. २ : अपशिंगे (ता. कोरेगाव) येथील वसंतदादा पाटील विद्यालय, रहिमतपूर संचलित अपशिंगे हायस्कूलमधील सहशिक्षक सयाजी माने यांच्या अवेळी करण्यात आलेल्या बदलीविरोधात आज ग्रामस्थ, विद्यार्थी व पालकांनी तीव्र आंदोलन केले. बदली तत्काळ रद्द करावी, या मागणीसाठी मुख्य चौकात सकाळी नऊ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
अचानक झालेल्या शिक्षक बदलीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होणार असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. श्री. माने हे गेल्या अनेक वर्षांपासून शाळेत कार्यरत असून, त्यांच्या अध्यापनामुळे विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक प्रगती, शिस्त व आत्मविश्वास निर्माण झाला असल्याचे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत अपशिंगे, सर्व ग्रामस्थ व विद्यार्थी-पालकांच्या वतीने पद्मभूषण डॉ. वसंतदादा शिक्षण संस्था, रहिमतपूर यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले, की सध्या शाळेत विद्यार्थी संख्या व तुकड्यांच्या तुलनेत शिक्षकांची कमतरता आहे, तसेच मुख्याध्यापकांचे शस्त्रक्रियेनंतर उपचार सुरू असल्याने शाळेचे शैक्षणिक कामकाज अडचणीत आले आहे. फेब्रुवारी महिन्यात दहावीची महत्त्वाची परीक्षा असून, या काळात विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण मार्गदर्शनाची नितांत गरज असते. श्री. माने यांचा विद्यार्थी व पालकांशी चांगला संवाद असून, परीक्षेच्या तोंडावर त्यांची बदली केल्यास विद्यार्थ्यांची मानसिकता बदलून शैक्षणिक नुकसान होऊ शकते, अशी भावना निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
संस्थेच्या पातळीवर सहसा एप्रिल- मे महिन्यात बदल्या केल्या जातात, मात्र शाळा व विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करता ही बदली अवेळी व अन्यायकारक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे सदर बदलीचा निर्णय तत्काळ स्थगित करून माने सरांना शाळेतच कायम ठेवावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.
आंदोलनादरम्यान ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितले, की चांगले, गुणवत्तापूर्ण शिक्षक बदलल्यास विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होतो. आमच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.
दरम्यान, रास्ता रोको आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. प्रशासन व शाळा व्यवस्थापनाने तत्काळ हस्तक्षेप करून तोडगा काढावा, अशी विनंती आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

--------------------------------

01580
अपशिंगे : येथील मुख्य चौकात शिक्षक बदलीविरोधात रास्ता रोको आंदोलन करताना विद्यार्थी व ग्रामस्थ.
----------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com