

शिक्षक समर्पण अन् सक्षमीकरण
- अरुण चव्हाळ
.......................................
पाच सप्टेंबरला हा राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जयंती दिन! शिक्षकांप्रति कृतज्ञता म्हणूनच संबंध भारत देशात त्यांची जयंती ''शिक्षक दिन'' म्हणून साजरी केली जाते. यानिमित्ताने गुरु-शिष्य परंपरा जपली जाते आणि ज्ञान-विचार-कृती-विश्वास आणि संस्कारांचे जतन अधोरेखित होते.
.......................................
समाजामध्ये सदैव जागृती करणारे शिक्षक ‘स्व’ जाणिवेतून समर्पण वृत्तीने कार्यरत राहतात. स्वतःचा आत्मविश्वास आणि कार्यसंस्कृती सांभाळून समाजाला सामाजिक वळण लावण्याचा वसा शिक्षकांनी घेतलेला आहे. म्हणूनच कोणत्याही देशाच्या लोकसंस्कृतीचे मानदंड शिक्षक आहेत. आपल्या भारत देशात शिक्षक असणारे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन देशाचे राष्ट्रपती झालेले आहेत. त्यामुळे विश्वात भारतीय शिक्षकांना आदरपूर्वक नजरेने बघितले जाते. सामाजिक सेवा ते राष्ट्रीय कर्तव्ये पार पाडण्यामध्ये शिक्षकांचा लक्षणीय सहभाग आहे.
आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण-२०२३ आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण-२०२४ मध्ये शिक्षकांचे सक्षमीकरण आणि सबलीकरण हा महत्त्वाचा घटक मानण्यात आलेला आहे. शालेय संस्कृतीचे मोलाचे घटक आणि अध्यापन-अध्ययन प्रक्रियेत प्रभावी आणि परिणामकारक भूमिका साकारणारे शिक्षक शिक्षणातील जबाबदार सामाजिक अभिकर्ता म्हणून श्रेष्ठ दर्जाचे आहेत. शिक्षकांनी कौशल्यांनी निर्माण केलेल्या उत्तम शैक्षणिक वातावरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह, सक्रियता आणि अध्ययनाची आवड निर्माण होते. भारतीय संस्कृतीमध्ये शिक्षकांना ‘गुरू’ म्हणून आदर्श मानले जाते. सर्वच गुरुजी आदर्शाची बांधिलकी आपल्या कर्तव्ये पालनातून पार पाडतात.
गुरुजी ज्ञानवंत म्हणून गणले जातात आणि त्याबरोबरच स्वतः चारित्र्यसंपन्न, कर्तव्यनिष्ठ, संयमी, व्यासंगी, प्रामाणिक, सचोटी आणि ध्येय आणि सजगता या गोष्टी स्वतःच्या आचरणातून सांभाळणारे गुरुजी समाजाचीही वर उल्लेखित मूल्यांद्वारे जडणघडण करत असतात.
यामुळे तर मग विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची जाणीव, बंधुत्व, देशभक्ती, संवेदनशीलता, आदरभाव, अहिंसा, समता, समानता, पारदर्शकपणा, वैज्ञानिक दृष्टिकोन, धैर्य, त्याग, लवचिकता, सर्जनशीलता, कल्पकता, एकता आणि एकात्मता, न्याय, पर्यावरणाप्रती कर्ती भूमिका, भारतीय गौरवशाली परंपरेचा समृद्ध वारसा आणि अभिमान, सेवा आणि परस्परांचा आदर आणि एकमेकांची कदर करण्याची वृत्ती साकारते. आई-वडिलांनंतर विद्यार्थी आपल्या गुरुजींचे विचार आणि संस्कार स्वीकारतात. त्यामुळे सामाजिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहते. देशाची सुरक्षितता आणि प्रगती विशिष्ट कालावधीमध्ये साध्य करण्याकरिता गुरुजींच्या भूमिकेची गरज दखलपात्र आहे. ती कालातीत आहे. त्यामुळे शासकांना गुरुजींची महत्ता कळते.
गुणवैशिष्ट्ये गुरुजींची
वर्तमान काळामध्ये तर गुरुजींच्या स्वतःच्या गुणवैशिष्ट्यांचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. यामध्ये बोधात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक या गुणवैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. बोधात्मक गुणवैशिष्ट्यांमध्ये विषयज्ञान क्षमता, अध्यापनावर प्रभुत्व, मूल्यांकनाचे ज्ञान, मानसशास्त्रज्ञान, व्यासंग आणि नियोजनक्षमता यांचा समावेश होतो. तर भावात्मक गुणवैशिष्ट्यांमध्ये सहानुभूती, उत्साह, श्रमनिष्ठा, समाजाभिमुखता, मार्गदर्शक आणि व्यावसायिक दृष्टिकोन या गुणवैशिष्ट्यांचा अंतर्भाव आहे. क्रियात्मक गुणवैशिष्ट्यांमध्ये न्यायप्रियता, प्रयोगाशीलता, वर्गनियंत्रक, नियोजक, नेतृत्व आणि उपक्रमशीलता या गुणवैशिष्ट्यांनी शिक्षकांनी स्वतःला समृद्ध करावे, असे अपेक्षित आहे.
शिक्षणाचा मुख्य हेतू आदर्श व चारित्र्यसंपन्न भारतीय नागरिक घडवणे, हा असल्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या मनातील जिज्ञासा, कुतूहल आणि विवेक जागृत करून, सुसंस्कृत माणूस घडविण्याचे महान कार्य स्वतःच्या अंतर्मनात डोकावून करावे लागते. शिक्षकांना स्वतःचे वर्तन, राहणीमान, बौद्धिक आणि शारीरिक क्षमता, कर्तव्यपूर्ती इत्यादी गोष्टींचा स्व आणि स्व विचारांचा खोलवर विचार करून आपले प्रतिबिंब विद्यार्थ्यांमध्ये रेखाटायचे असते. त्यामुळे शिक्षकांकडे जबाबदार माणूस म्हणून सर्वजणच पाहतात. अनुभव आणि तंत्रज्ञानाच्या वापराने शिक्षकांना समाजाला चांगल्या गोष्टींचे वळण लावण्याचे काम सर्वांच्या सहकार्याने यशस्वी करावे लागते. शिक्षकांनीही स्वतःमधील प्रधान कर्तव्ये, केंद्रीय गुणविशेष आणि दुय्यम गुणविशेष यांची स्वपरीक्षा घेऊन आपले मार्गक्रमण करणे गरजेचे आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वातील बलस्थाने अधिक बळकट करून मर्यादांच्या बाबतीत मर्यादांची लक्ष्मण रेषा विस्तारित केली पाहिजे. याकरिता शिक्षकांमधील स्वयंप्रेरणा आणि स्वयंशिस्त सदैव कार्यरत असली पाहिजे. शिक्षकांनी लोककल्याणाचा साकल्याने विचार केल्यानंतर आपल्या अध्यापनाचा गुणात्मक दर्जा आणि सामाजिक सुधारणेचा दर्जाही उजळत राहतो.
शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थ्यांना शिक्षित आणि शिक्षकांना प्रशिक्षित केले जात आहे. काळानुरूप शिक्षकांमधील बदल घडविण्यासाठी सदैव शिक्षण खाते तत्पर आहे. विद्यार्थी आणि शिक्षक आत्मनिर्भर होण्यासाठी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने १० क्षमताक्षेत्रे सुचविली आहेत. यामध्ये संदर्भक्षमता, संबोधक्षमता, आशयज्ञानक्षमता, शैक्षणिक व्यवहारक्षमता, शैक्षणिक
उपक्रमक्षमता, शैक्षणिक साहित्य निर्मिती व वापर क्षमता, मूल्यांकनक्षमता, व्यवस्थापनक्षमता, पालक संपर्कक्षमता आणि समाज संपर्कक्षमता याबाबतीत शिक्षकांचा कृतिशील सहभाग महत्त्वाचा मानण्यात आलेला आहे. हे जरी महत्त्वाचे असले तरी
अनेक स्थानिक प्राधिकरणाच्या शाळांमध्ये सेवक, कारकून, क्रीडाशिक्षक आणि कलाशिक्षक यांची कमतरता असल्यामुळे शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या शिक्षकांवर अतिरिक्त कामांचा ताण येतो. ऑनलाइनची कामे गरजेची असली तरी वेळखाऊपणाची आहेत. त्यामुळे शिक्षकांना वर्गाला चिकटून राहण्याची व्यवस्था शासनाने निर्माण करून द्यावी. उपक्रमांचा भडीमार कमी केला तर खूप काही शैक्षणिक गोष्टी साध्य होतात. राज्य शासनाचे अभ्यासक्रमाचे धोरण आणि परत स्थानिक वरिष्ठांचे शैक्षणिक धोरण यामध्ये शिक्षकांची तारांबळ उडते. प्रयोगशीलतेच्या नावाखाली अनेक ठिकाणी शिक्षकांची स्व-अध्यापनाची गोची होते. त्यामुळे वर्गाची गरज लक्षात घेऊन आणि विद्यार्थी ज्या परिप्रेक्ष्यातून आलेले आहेत त्यांची मानसिक जडणघडण लक्षात घेऊन शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या कलेने शिकवू दिले पाहिजे.
शिक्षणामध्ये क्रांती कधीच नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची आणि संस्कारांची उत्क्रांती झिरपू देण्यासाठी शिक्षकांना वरिष्ठांनी सहकार्य केले पाहिजे. बहुतांश शिक्षकांना शाळाबाह्य कामांना जुंपल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातील शैक्षणिक जबाबदाऱ्या पार पाडताना शिक्षकांच्या नाकीनऊ येत आहेत. ‘कुणीही यावे आणि शाळेला टिकली मारून जावे’, हे तर आता सरसकट झालेले आहे. ‘शाळांमध्ये जे आहे ते बघा, सुधारणेसाठी शाळांमध्ये जे नाही ते उपलब्ध करून द्या,’ ही समस्त शिक्षकांची हाक सरकार, गाव आणि समाजाने समजून घेतली पाहिजे. शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सम्यकपणाने विचारांची मांडणी आणि कार्याची तत्परता जपली पाहिजे. सनसनाटीकरिता शाळांची ‘बाहुली’ करू नये. अनुभवाने सांगतो, माझ्या शाळेत स्वतः शालेय स्वच्छतागृहाची आणि शालेय परिसराची स्वच्छता स्वतः करावी लागते. शालेय व्यवस्थापन समितीची भूमिका यामध्ये सातत्याने शाळा कर्तव्यनिष्ठ पाहिजे. पाणीपुरवठ्याच्या शाश्वत सोई उपलब्ध करून देण्यात याव्यात. दिवाबत्तीची सोय आणि क्रीडांगणाची उपलब्धता या पायाभूत गोष्टी मोलाच्या आहेत. शिक्षकांना सेवांतर्गत प्रशिक्षण देत असताना सेवांतर्गत परीक्षांही स्थानिक पातळीवर घेण्याची सोय उपलब्ध करून दिली पाहिजे. केंद्राच्या किंवा राज्यांच्या अर्थसंकल्पात अर्थसंकल्पीय तरतूद करून प्रशासकीय यंत्रणेनेच शाळांमध्ये शालेय पोषण आहार, शालेय इमारतींचे बांधकाम, गणवेश, बूट सॉक्स वाटप, पाठ्यपुस्तकांचे वितरण, दप्तरांचे वितरण स्वतः केले पाहिजे. या उल्लेखित योजनांचे अभिलेखे स्वतंत्र यंत्रणेने ठेवले पाहिजेत.
शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना खरा न्याय देऊन समृद्ध भारत वेगाने घडण्यासाठी सरकारने वेळोवेळी गुरुबंधूंची भूमिका घेऊन सहकार्य करावे. अनेक गोष्टींना तोंड देत गुरुजन राबत आहेत, हे वाखाण्याजोगे आहे. उद्याच्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने सर्व गुरुबंधूंना शुभेच्छा!
७७७५८४१४२४
..................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.