नगर ः माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या धोरणांविरोधात अहिल्यानगरला आंदोलन

नगर ः माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या धोरणांविरोधात अहिल्यानगरला आंदोलन
Published on: 

माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या
धोरणांविरोधात अहिल्यानगरला आंदोलन**

सलग दोन वर्षे लाभांशात घट; वर्गणी, कृतज्ञता निधीतील वाढीवर आक्षेप

ॲग्रोवन वृत्तसेवा

अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या संचालक मंडळाने सभासदांच्या कर्जावरील व्याजदरात एक टक्का वाढ, वर्गणीत सरसकट एक हजार रुपयांची वाढ, सलग दोन वर्षे लाभांशात झालेली घट यांसह विविध निर्णय घेतल्याने सभासद संताप व्यक्त करत आहेत. गुरुवारी (ता. ५) सोसायटीच्या मुख्य शाखेसमोर विरोधकांनी निषेध आंदोलन केले. सत्ताधारी मंडळाचे माजी स्वीकृत संचालक उद्धव सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आले.

अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीत सभासदांनी मोठ्या आशेने सत्ता परिवर्तन केले. मात्र, सत्तेवर आल्यानंतर संचालकांनी सभासदांचा भ्रमनिरास केला आहे. संचालक मंडळाने कर्जावरील व्याजदरात एक टक्का वाढ, वर्गणीत सरसकट एक हजार रुपयांची वाढ, सलग दोन वर्षे लाभांशात केलेली घट, तसेच कृतज्ञता निधीच्या वसुलीत केलेली वाढ या निर्णयांना विरोध करण्यासाठी जिल्ह्यातील सभासदांची बैठक झाली. या वेळी पुरोगामी सहकार मंडळाचे नेते व माजी अध्यक्ष प्रा. भाऊसाहेब कचरे, धनंजय म्हस्के, उत्तमराव खुळे, काकासाहेब घुले आदी उपस्थित होते.

सोनवणे म्हणाले, की सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीवेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. सभासदांच्या हिताला प्राधान्य दिले नाही. सभासदांच्या हिताच्या दृष्टीने संबंधित निर्णयांचा फेरविचार करावा, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी निवेदन देण्याचा प्रयत्न केला असता, सुरुवातीला विद्यमान व माजी अध्यक्ष यांनी सेवानिवृत्तांना या ठिकाणी येण्याचा अधिकार नाही, असे सांगत निवेदन स्वीकारण्यास नकार दिल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर सभासदांनी पदाधिकाऱ्यांना निवेदन देत कर्जाच्या व्याजदरात कपात करण्याची मागणी केली.

अध्यक्षांसह सत्ताधाऱ्यांबाबत सभासदांत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. संचालक मंडळाच्या या निर्णयामुळे सभासदांना दरमहा तीन ते चार हजार रुपयांचा आर्थिक भुर्दंड पडत असून, सलग दोन सर्वसाधारण सभांनंतर लाभांश कमी दिला. कृतज्ञता निधीच्या वसुलीत दुपटीपेक्षा जास्त वाढ करूनही प्रत्यक्षात निधी देताना मात्र वाढ रोखली. संस्थेच्या ७५ वर्षे जुन्या इमारतीवर तिसऱ्या मजल्याचे अनधिकृत बांधकाम तसेच शाखांमध्ये रंगरंगोटी, फर्निचर आणि दुरुस्तीच्या नावाखाली खर्च सुरू आहे. यामुळे सभासदांना मिळणारा लाभांश कमी झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

फोटो कॅप्शन :

अहिल्यानगर ः अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयांविरोधात सभासदांनी आंदोलन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.