नव्या शिक्षकांची आता आंतरजिल्हा बदली नाहीच

नव्या शिक्षकांची आता आंतरजिल्हा बदली नाहीच
Published on

सकाळ एक्सक्ल्युझिव्ह
-------------
नव्या शिक्षकांची आता आंतरजिल्हा बदली नाहीच
सेवानिवृत्तीपर्यंत एकाच जिल्ह्यात नोकरी; पती-पत्नी एकत्रीकरण, आजारपणाचा असेल अपवाद
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ३० : राज्यात सध्या ३० हजार २०९ पदांची रेकॉर्डब्रेक शिक्षक भरती सुरू आहे. आता नव्याने शिक्षक भरती झालेल्यांची आंतरजिल्हा बदली होणार नाही. त्या त्या जिल्ह्यात या शिक्षकांची बदली होईल, पण स्वत:च्या किंवा दुसऱ्या जिल्ह्यात बदली होणार नाही. पती-पत्नी एकत्रीकरण किंवा गंभीर आजारपणाचा त्यासाठी अपवाद राहील, असे माध्यमिक शिक्षण संचालकांनी ‘सकाळ’ला बोलताना स्पष्ट केले.
सध्याच्या शिक्षक भरतीत जिल्हा परिषदेच्या शाळांमधील १३ हजार ३५१ शिक्षकांची पदे आहेत. तर नगरपालिका, महापालिका शाळांमधील २२३४ आणि आदिवासी विकास विभागाच्या शासकीय शाळांमधील दोन हजार ४२१ व शासकीय विद्यानिकेतनमधील ५६ आणि खासगी अनुदानित शाळांमधील १२ हजार १४८ पदे आहेत. यातील भरतीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, दुसरा टप्पा पुढच्या महिन्यापासून सुरू होणार आहे. अनेक उमेदवारांनी स्वजिल्ह्यातील रिक्तपदे, आपल्याला मिळालेली टीईटी व डीटीएडमधील गुणांचा विचार करून कोकण व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये शिक्षक भरतीसाठी अर्ज केले आहेत. यातील अनेकांना मुलाखतीशिवाय संवर्गातून त्या त्या जिल्ह्यांमध्ये नोकरीची संधी मिळाली आहे. यातील अनेकांना पाच-दहा वर्षांनंतर आपल्या जिल्ह्यात बदली होऊन जाता येईल, अशी आशा आहे. मात्र, नव्याने शिक्षक भरती झालेल्यांची आंतरजिल्हा बदली होणार नाही. ठरावीक वर्षांनी अनेक शिक्षक आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज करतात, त्यातून सध्याच्या जिल्ह्यात शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त राहतात आणि त्या ठिकाणी अध्यापनाचा विषय गंभीर बनतो. त्यामुळे आता आंतरजिल्हा बदल्या होणार नसल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
---
कोट:
आता शिक्षक भरती झालेल्यांची आंतरजिल्हा बदली होणार नाही. पती-पत्नी एकत्रीकरण किंवा आजारपण त्यासाठी अपवाद राहील. नवनियुक्त शिक्षकांना त्याच जिल्ह्यात नोकरी करावी लागणार आहे.
- डॉ. महेश पालकर, संचालक, माध्यमिक शिक्षण
---
सध्याची शिक्षक भरती
एकूण शिक्षक भरती
३०,३०९
मुलाखतीशिवाय भरती
१९,८८१
मुलाखतीसह भरती
१०,३२८
---
चौकट
सध्या आंतरजिल्हा बदली थांबलेलीच
सध्या १० ते १२ वर्षांपासून स्वत:चा जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या शिक्षकांची संख्या सुमारे पाच हजारांपर्यंत आहे. त्यांची आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया सध्या ‘एसआयआर’ (मतदार पुनरीक्षण) व जनगणनेच्या कामामुळे थांबली आहे. शिक्षक नेत्यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या भेटी घेतल्या, पण यंदा आंतरजिल्हा बदल्या होऊ शकलेल्या नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pavitra Portal teacher recruitment 2026
Maharashtra Teacher Recruitment
Chandwad Teacher Vacancies
UP Teachers Relief
Marathi News Esakal
www.esakal.com