शालाबाह्य मुलांना बालरक्षकांकडून धडे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

- वर्षभरात हजार विद्यार्थ्यांचा शोध
- शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न 

पिंपरी (पुणे) : शिक्षण हक्क कायद्यानुसार एकही मूल निरक्षर राहू नये, यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या योजना आखल्या जातात. त्यापैकी शालाबाह्य मुलांच्या शोधार्थ गेल्या वर्षापासून महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांमधील "बालरक्षक'ची निवड करण्यात आली. वर्षभरात या बालरक्षकांनी सुमारे एक हजार शालाबाह्य मुलांचा शोध घेतला. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून एक पाऊल साक्षरतेकडे टाकले आहे.
 
जागतिक साक्षरता दिन हा दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. यानिमित्ताने शहरातील शालाबाह्य मुलांच्या शिक्षणाची स्थिती जाणून घेतली. पिंपरी-चिंचवड शहरात बालमजुरी, अल्पवयीन गुन्हेगारी, रस्त्यांवर भीक मागणारे अशा अनेक लहान मुलांची संख्या हजारात आहे. ही मुले पालकांच्या कामाच्या ठिकाणी खेळत बसतात किंबहुना त्यांना कामात मदत करतात. त्यामुळे शहरातील निरक्षरांची संख्या दिसून येते. 

बालरक्षकांनी दिलेल्या अहवालानुसार आजही निरक्षरतेमध्ये महिलांनंतर बालकांचे प्रमाण लक्षणीय आहे. शिक्षण विभागाने नेमलेले 56 बालरक्षक शहरातील बांधकाम प्रकल्प, रेल्वे स्टेशन, पालावर, वीटभट्ट्याच्या आजूबाजूच्या वाड्या-वस्त्यांवर जाऊन साक्षरतेचे धडे देत आहेत. या बालरक्षकांना दोन हजार 38 मुले सापडली. निव्वळ एक हजार शालाबाह्य मुलांना शाळेत दाखल करून घेण्यास महापालिका शिक्षण विभागाला यश मिळाले आहे. यापैकी केवळ तीन मुलांकडेच "हमी शिक्षण कार्ड' आढळले. 

स्थलांतरित सापडलेली मुले : 2 हजार 38 
शाळेत दाखल मुले :
1 हजार 
सतत गैरहजर : 1008 
हमी कार्ड दिलेले :
79 

निरक्षरता दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यानुसार केंद्र सरकारने सर्वांसाठी शिक्षण हक्क कायद्यांतर्गत हजारो शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून साक्षर केले आहे. 
- ज्योत्स्ना शिंदे, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: teaching for out of school childrens in pimpri city