तेजस्विनी बसमध्ये पुरुषांची घुसखोरी

नीलम कराळे
शनिवार, 2 जून 2018

महिला दिनाचे औचित्य साधून ही सेवा सुरू करण्यात आली. महिला प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता यावा हा उद्देश होता. या बसेससाठी खरेतर महिला वाहक असावेत असा नियम आहे. परंतु या सर्व बाबी कागदावरच राहिल्याचे प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले.

पुणे - वेळ : दुपारी एक वाजता. स्थळ : लक्ष्मीनारायण थिएटर बस स्टॉप. कात्रज ते शिवाजीनगर या ‘तेजस्विनी’ महिला स्पेशल बस असताना, यातून पुरुषही प्रवास करत असल्याचे ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने अनुभवले. याबाबत वाहकाकडे विचारणी केली असता उडवाउडवीची उत्तरे ऐकायला मिळाली. महिला प्रवाशांची मते जाणून घेतली असता, या बससुविधेमागील पीएमटीच्या हेतूलाच हरताळ फासला गेल्याचे त्यांनी सांगितले.

शहरी भागामध्ये नोकरी-व्यवसायासाठी प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे. अपुऱ्या बसफेऱ्यांमुळे होणाऱ्या त्रासापासून त्यांची सुटका करण्याच्या उद्देशाने पीएमपीएमएलने खास महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र बससेवा सुरू केली होती. महिला दिनाचे औचित्य साधून ही सेवा सुरू करण्यात आली. महिला प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता यावा हा उद्देश होता. या बसेससाठी खरेतर महिला वाहक असावेत असा नियम आहे. परंतु या सर्व बाबी कागदावरच राहिल्याचे प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले.

या बसेससाठी महिला वाहक आहेत का, पुरुषांनाही या बसमधून प्रवास करू का दिले जाते, असे विविध प्रश्‍न उपस्थित होत 

आहेत. वृषाली मानकर म्हणाली, ‘‘महिलांसाठी खास बससुविधा असल्यामुळे या बसला आम्ही महाविद्यालयीन विद्यार्थिनी पसंती देत होतो. तसेच घरचेदेखील यामुळे निर्धास्त झाले होते. परंतु प्रशासनातीलच कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या सुविधेचा फज्जा उडाला आहे. जी सुरक्षितता आम्हाला मिळायला हवी होती ती मिळत नाही.’’ सुवर्णा देशमुख म्हणाली, ‘‘महिलांसाठी वेगळी बस ही संकल्पना चांगली होती. परंतु ती योग्य प्रकारे राबवली गेली नाही. प्रशासनाने चांगल्या उपक्रमात सातत्य ठेवावे अशी अपेक्षा असते.  महिलांची ही साधी मागणीदेखील पूर्ण करण्यास प्रशासन अपयशी ठरले आहे.’’

 तेजस्विनी ही बससुविधा फक्त महिलांसाठी असून, रविवारी महिला प्रवासी संख्या कमी असल्यामुळे फक्त या दिवशीच पुरुष या बसमधून प्रवास करू शकतात. इतर दिवशीही पुरुष या बसमधून प्रवास करत असतील तर त्या बसच्या वाहक आणि चालकाची आम्ही चौकशी करू.
- डी. जी. माने, ट्रॅफिक मॅनेजर, पीएमटी 

Web Title: Tejaswini bus Pune news