सरपंचपदाच्या लालसेपोटी पोटच्या चिमुकलीचा खून

सरपंचपदाच्या लालसेपोटी पोटच्या चिमुकलीचा खून
Published on

सरपंचपदाच्या लालसेपोटी पोटच्या मुलीचा खून
केरूरच्या तरुणाचे कृत्य, तेलंगणात दिला मृतदेह फेकून
मुखेड (जि. नांदेड), ता. ३ : सरपंचपदाच्या निकषासाठी अडसर ठरणाऱ्या तिसऱ्या अपत्यामुळे निवडणुकीपासून वंचित राहण्याची शक्यता पाहून पोटच्या सहा वर्षांच्या मुलीला तेलंगणातील बोधन (जि. निजामाबाद)जवळील कॅनॉलमध्ये फेकून खून केल्याची घटना उघडकीस आली. बोधन पोलिसांनी शोध घेत शुक्रवारी (ता. २०) रात्री केरूर (ता. मुखेड) येथील संशयित पांडुरंग कोंडामंगले यास ताब्यात घेतले. प्राची पांडुरंग कोंडामंगले (वय सहा वर्षे) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे.
शहरातील बाराहाळी नाका येथे पांडुरंग कोंडामंगले याचा सलूनचा व्यवसाय आहे. केरूर ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण ओबीसी महिलेस घोषित झाल्यानंतर पांडुरंग यास सरपंचपदाचे वेध लागले. कोंडामंगले यास अगोदर जुळे अपत्य व नंतर एक मुलगा अशी तीन अपत्ये आहेत. निवडणुकीसाठी दोनपेक्षा जास्त अपत्ये नसावी, असा नियम असल्याचे कळल्यावर त्याने एक अपत्य संपवण्यासाठी हा प्रकार केल्याची माहिती प्राथमिक चौकशीत पुढे आली आहे. यासाठी पांडुरंगने मुलगी प्राची हिला सकाळी शाळेतून घेतले आणि बोधन (जि. निजामाबाद) येथे साहित्य खरेदीसाठी जात असल्याचे सांगत दुचाकीवर बसवून नेले. बोधनजवळील कट्टापल्ली शिवारातील वाहणाऱ्या कॅनॉलमध्ये फेकून दिले. त्यावेळी तेथील एका शेतकऱ्याने पाहून पांडुरंगला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु, निसटून पळ काढत त्याने गाव गाठले. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी तेलंगणातील पोलिस दुचाकीवरील नंबरवरून नावाचा शोध घेत मुखेड येथे आल्यानंतर स्थानिक पोलिसांना ही घटना सांगितली. यावेळी पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, फौजदार माने यांनी तत्परता दाखवत पांडुरंग यास चौकशीसाठी बोलावले, मात्र सुरवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु, अधिक चौकशी केली असता त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा तेलंगणा पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com