वाढत्या तापमानात पिके व मातीचे व्यवस्थापन

वाढत्या तापमानात पिके व मातीचे व्यवस्थापन
Published on: 

पान १४ साठी

वाढत्या तापमानात पिके अन् मातीचे व्यवस्थापन
-------------------
डॉ. महेश आजबे, डॉ. समाधान सुरवसे, डॉ. अशोक कडलग
-------------------
हवामान बदलामुळे मागील काही वर्षांत तापमानातील चढ-उतार, पावसाचे अनियमित वितरण, पावसातील दीर्घ खंड तसेच अल्प कालावधीत होणारी अतिवृष्टी यांसारख्या हवामानविषयक घटनांची तीव्रता आणि वारंवारता वाढत आहे. या बदलांचा शेती उत्पादनावर, पिकांच्या वाढीवर आणि उत्पादकतेवर प्रतिकूल परिणाम होत आहे. वाढते तापमान केवळ पिकांच्या वाढीवर आणि प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेवर परिणाम करत नाही, तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण, अन्नद्रव्यांची उपलब्धता व ग्रहणक्षमता, सेंद्रिय कर्बाचे प्रमाण आणि मातीतील सूक्ष्मजीवांच्या कार्यक्षमतेवरही परिणाम करते. तापमानवाढ आणि अनियमित पर्जन्यमानामुळे मातीतील जलसंतुलन बिघडणे, अन्नद्रव्यांचा ऱ्हास होणे आणि सेंद्रिय पदार्थांच्या विघटनाच्या प्रक्रियेत बदल होणे यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत केवळ पीक व्यवस्थापनावर भर देण्याऐवजी पीक आणि मृदा व्यवस्थापन यांचा समन्वय साधणे आवश्यक आहे. जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणे, सेंद्रिय कर्ब वाढविणे, संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन, सेंद्रिय पदार्थांचा वापर, सूक्ष्मजिवांची कार्यक्षमता वाढविणे, कार्यक्षम सिंचन पद्धतींचा अवलंब आणि हवामानास अनुकूल पिके व वाणांची निवड या उपाययोजना हवामान बदलाच्या परिणामांचा सामना करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात.
------------------
तापमानवाढीचा पिकांवर परिणाम ः
पिकांच्या योग्य वाढीसाठी अनुकूल तापमान, जमिनीतील पुरेसा ओलावा आणि संतुलित अन्नद्रव्यांची उपलब्धता आवश्यक असते. तापमानात वाढ झाल्यास जमिनीतील बाष्पीभवन तसेच पिकांमधून होणारे बाष्पोत्सर्जन वाढते. परिणामी जमिनीतील उपलब्ध ओलावा वेगाने कमी होऊन पिकांच्या पाण्याच्या गरजेत वाढ होते. जमिनीतील ओलावा पिकाच्या गरजेपेक्षा जास्त कमी झाल्यास पिकामध्ये पाण्याचा ताण निर्माण होतो. तापमानवाढीबरोबरच जमिनीतील ओलावा कमी झाल्यास अधिक तीव्र परिणाम दिसून येतात.
पिकामधील ताण ः
- पानांमधील रंध्रे बंद होणे.
- प्रकाशसंश्लेषणाचा दर कमी होणे.
- पानांची कोमेजणे
- मुळांची वाढ व कार्यक्षमता कमी होणे
- पिकाच्या वाढीवर व उत्पादनक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होणे.

संवेदनशील अवस्था ः
फुलोरा, फलधारणा, शेंगा किंवा दाणे भरणे यांसारख्या संवेदनशील वाढीच्या अवस्थांमध्ये उष्णतेचा ताण अधिक जाणवतो. या अवस्थेत उच्च तापमानामुळे परागीभवन, फलधारणा आणि दाणे भरण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊन उत्पादन व गुणवत्तेत घट होऊ शकते. त्यामुळे तापमानवाढीच्या परिस्थितीत संवेदनशील वाढीच्या अवस्थांची पिकावरील ताणाची योग्य ओळख पटवून मातीतील ओलावा टिकवून ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी गरजेनुसार कार्यक्षम सिंचन करणे, आच्छादनाचा वापर करणे आणि संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन तंत्रात अवलंब आवश्यक आहे. विशेषतः दीर्घकाळ पावसाचा खंड असल्यास पिकाची पाणी व पोषणाची गरज लक्षात घेऊन पूर्वनियोजन करणे महत्त्वाचे ठरते.
--------------------
जमिनीतील ओलावा टिकविण्यासाठी...आच्छादनाचा वापर ः
तापमानवाढीच्या परिस्थितीत सर्वप्रथम जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यावर भर देणे आवश्यक आहे. उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी आच्छादनाचा वापर हा अत्यंत सोपा, प्रभावी आणि पर्यावरणपूरक उपाय आहे. सेंद्रिय आच्छादनासाठी पीक अवशेष, काडीकचरा, पालापाचोळा किंवा इतर योग्य सेंद्रिय पदार्थांचा वापर करता येतो.
आच्छादनासाठी सेंद्रिय पदार्थांचा वापर केल्यामुळे त्यांचे विघटन झाल्यानंतर त्यातील सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिसळतात. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढण्यास, जमिनीची जलधारण क्षमता सुधारण्यास आणि मृदा संरचना टिकवून ठेवण्यास मदत होते. त्यामुळे तापमानवाढ आणि पावसातील अनियमितता अशा दोन्ही परिस्थितींमध्ये आच्छादन, सेंद्रिय पदार्थांचा वापर आणि कार्यक्षम सिंचन यांचा एकत्रित वापर करून जमिनीतील ओलाव्याचे संवर्धन करणे शक्य होते.

फायदे ः
- आच्छादनामुळे जमिनीच्या पृष्ठभागावर पडणाऱ्या थेट सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी होते.
- जमिनीतील बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन ओलावा अधिक काळ टिकून राहतो.
- जमिनीच्या पृष्ठभागाचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते.
- दिवसाच्या वेळी होणारी तापमानवाढ कमी करण्यास मदत होते.
- जमिनीतील सूक्ष्मजीवांच्या कार्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होते.
- सेंद्रिय कर्ब वाढण्यास, जमिनीची जलधारण क्षमता सुधारण्यास आणि मृदा संरचना टिकवून ठेवण्यास मदत होते.
- सूर्यप्रकाश जमिनीच्या पृष्ठभागापर्यंत कमी प्रमाणात पोहोचल्यामुळे तणांच्या उगवणीवर आणि वाढीवरही नियंत्रण मिळविता येते.
सेंद्रिय पदार्थांचा वापर ः
- तापमानवाढीच्या परिस्थितीत जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे महत्त्व अधिक वाढते. शेणखत, कंपोस्ट, गांडूळखत, पिकांचे अवशेष आणि उपलब्धतेनुसार हिरवळीची खते यांचा नियमित व योग्य प्रमाणात वापर केल्यास जमिनीची भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.
- सेंद्रिय पदार्थांमुळे जमिनीची जलधारण क्षमता, मृदा संरचना आणि भुसभुशीतपणा सुधारतो. परिणामी पावसाचे किंवा सिंचनाचे पाणी जमिनीत अधिक प्रमाणात मुरण्यास आणि उपलब्ध ओलावा तुलनेने अधिक काळ टिकून राहण्यास मदत होते. विशेषतः हलक्या जमिनीत सेंद्रिय पदार्थांचा नियमित वापर केल्यास ओलावा संवर्धन आणि पिकांना पाण्याची उपलब्धता सुधारण्यास फायदा होतो.
- सेंद्रिय पदार्थ हे मातीतील सूक्ष्मजिवांसाठी ऊर्जा व कार्बनचा स्रोत असल्याने त्यांच्या वापरामुळे मातीतील जैविक क्रियाशीलता आणि अन्नद्रव्यांच्या चक्रास चालना मिळते. त्यामुळे सेंद्रिय पदार्थांचा वापर हा केवळ जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठीच नव्हे, तर हवामानातील ताण सहन करण्याची जमिनीची क्षमता वाढविण्यासाठीही महत्त्वाचा आहे. म्हणून केवळ रासायनिक खतांवर अवलंबून न राहता सेंद्रिय व रासायनिक आणि जैविक खतांचा संतुलित वापर, पिकांचे अवशेष व्यवस्थापन आणि हिरवळीच्या खतांचा समावेश असलेले एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन स्वीकारणे आवश्यक आहे. यामुळे जमिनीची दीर्घकालीन सुपीकता टिकवून ठेवण्यास आणि बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत पिकांची उत्पादकता स्थिर राखण्यास मदत होऊ शकते.

योग्य पद्धतीने मशागत ः
- अति मशागत केल्यामुळे जमिनीतील ओलावा वेगाने कमी होऊ शकतो. तसेच जमिनीची नैसर्गिक संरचना आणि भौतिक गुणधर्म बिघडण्याची शक्यता असते. वारंवार मशागत केल्याने जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे जलद विघटन होण्याबरोबरच जमिनीची धूप आणि संरचनेतील ऱ्हास होऊ शकतो. त्यामुळे जमिनीची स्थिती, पीक पद्धती आणि उपलब्ध साधनसामग्री यांचा विचार करून कमीत कमी आणि आवश्यक तेवढीच मशागत करण्यावर भर द्यावा.
- पिकांचे अवशेष जाळण्याऐवजी त्यांचे योग्य व्यवस्थापन करून ते जमिनीच्या पृष्ठभागावर आच्छादन म्हणून ठेवणे किंवा योग्य पद्धतीने जमिनीत मिसळणे फायदेशीर ठरते. यामुळे जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यास, सेंद्रिय कर्ब वाढविण्यास, मृदा संरचना सुधारण्यास आणि सूक्ष्मजीवांच्या कार्यक्षमतेस चालना देण्यास मदत होते.
- कीड-रोगग्रस्त किंवा रोगजनकांचा प्रादुर्भाव असलेल्या पिकांच्या अवशेषांचे व्यवस्थापन करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अशा अवशेषांचा अनियंत्रित वापर केल्यास रोग व किडींचा प्रसार होण्याची शक्यता असते. त्यामुळे अवशेषांचा वापर करण्यापूर्वी त्यांची स्थिती तपासून, आवश्यकतेनुसार योग्य विघटन, कंपोस्टिंग किंवा इतर शिफारशीनुसार व्यवस्थापन करावे.

योग्य सिंचन नियोजन ः
तापमानवाढीमुळे बाष्पीभवन व बाष्पोत्सर्जन वाढल्याने पिकांची पाण्याची गरज वाढू शकते. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा अपव्यय टाळून पिकाची वाढीची अवस्था, जमिनीतील ओलावा आणि हवामानाची स्थिती लक्षात घेऊन सिंचनाचे नियोजन करणे आवश्यक आहे. पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी परिस्थितीनुसार ठिबक किंवा तुषार सिंचनासारख्या कार्यक्षम सिंचन पद्धतींचा अवलंब करता येतो. ठिबक सिंचनाद्वारे पिकाच्या मुळांच्या कार्यक्षम क्षेत्रात नियंत्रित प्रमाणात पाणी देता येत असल्याने पाण्याची बचत आणि ओलावा व्यवस्थापनास मदत होते.
सिंचनाची वेळ ठरविताना स्थानिक हवामानाचा विचार करावा. शक्य असल्यास सकाळी लवकर किंवा संध्याकाळच्या वेळेत सिंचन करणे उपयुक्त ठरते. मात्र केवळ वेळेच्या आधारावर सिंचन न करता जमिनीतील उपलब्ध ओलावा आणि पिकाची प्रत्यक्ष पाण्याची गरज यांना प्राधान्य द्यावे. सिंचनाचे नियोजन करताना जमिनीचा प्रकार, पिकाची अवस्था, मुळांची खोली, हवामान आणि उपलब्ध पाण्याचे प्रमाण यांचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे. विशेषतः फुलोरा, फलधारणा किंवा उत्पादननिर्मितीच्या संवेदनशील अवस्थेत पाण्याचा ताण येणार नाही याची काळजी घ्यावी.

संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन ः
उष्णतेच्या ताणाच्या परिस्थितीत पिकांच्या मुळांची वाढ, मुळांची कार्यक्षमता आणि अन्नद्रव्यांचे शोषण प्रभावित होऊ शकते. त्यामुळे माती परीक्षणाच्या आधारे खत व्यवस्थापन करणे अधिक महत्त्वाचे ठरते. संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापनामुळे पिकांची निरोगी वाढ, मुळांची कार्यक्षमता आणि प्रतिकूल हवामान सहन करण्याची क्षमता सुधारण्यास मदत होऊ शकते. विशेषतः तापमानवाढ परिस्थितीत योग्य पोषण व्यवस्थापन हे पिकांची वाढ व उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहे. दुष्काळ परिस्थितीत ह्युमिक ॲसिड, ०:५२:३४, ०:०:५०, १३:०:४५ यांचा योग्य व पिकाच्या गरजेनुसार वापर उपयुक्त ठरतो.

तण व्यवस्थापन ः
तण हे पिकांशी पाणी, अन्नद्रव्ये, प्रकाश आणि वाढीसाठी आवश्यक जागा यांसाठी स्पर्धा करतात. तापमानवाढीच्या परिस्थितीत ही स्पर्धा अधिक तीव्र होऊन पिकांवरील पाण्याचा ताण वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरुवातीच्या पीक वाढीच्या अवस्थेत तणांचे प्रभावी व वेळेवर व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे.
तण व्यवस्थापनासाठी आंतरमशागत, योग्य आच्छादन, हाताने किंवा यांत्रिक पद्धतीने तण नियंत्रण आणि गरजेनुसार शिफारशीत तणनाशकांचा वापर करता येतो. तणनाशकांचा वापर करताना पिकाची अवस्था, तणांचा प्रकार व वाढीची अवस्था, तणनाशकाची शिफारशीत मात्रा आणि वापरण्याची योग्य पद्धत यांचे काटेकोर पालन करावे. एकात्मिक तण व्यवस्थापनाचा अवलंब केल्यास पिकांशी होणारी स्पर्धा कमी करून उपलब्ध पाणी व अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर करता येतो.
-------------------------------------------
- डॉ. महेश आजबे, ८८३००७६३३५
(एम. जी. एम. नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय, गांधेली, जि. छत्रपती संभाजीनगर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com