पुण्यात जम्बो हॉस्पीटल उभारणार; स्थायी समितीच्या अध्यक्षांनी दिली माहिती 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 19 August 2020

बाणेर - बालेवाडी येथील एका इमारतीत 44 आयसीयू बेडस्‌ आणि 270 ऑक्‍सिजन बेडस्चे तात्पुरते कोविड हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे.

पुणे,ता. 18 : पंचशील फाउंडेशनच्या वतीने "सीएसआर' फंडातून बाणेर - बालेवाडी येथील एका इमारतीत 44 आयसीयू बेडस्‌ आणि 270 ऑक्‍सिजन बेडस्चे तात्पुरते कोविड हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. या हॉस्पिटलला डॉक्‍टर्स,अन्य कर्मचारी वर्गासह रुग्णांचे जेवण व व्यवस्थापकीय खर्चासाठी डॉ. भाकरे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ऍण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटला महापालिकेच्या वतीने प्रत्येक बेडसाठी 1400 रुपये देण्याचा प्रस्ताव आज स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मंगळवारी मंजूर करण्यात आला. 

बैठकीनंतर समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी ही माहिती दिली. रासने म्हणाले,"" बाणेर -बालेवाडी येथील एका इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. या इमारतीमधील अकोमोडेशन रिझर्वेशनच्या माध्यमातून सुमारे 4 हजार 200 चौरस मीटर क्षेत्रफळाचा तळ मजला आणि आणि सहा मजल्यांची इमारत महापालिकेच्या ताब्यात येत आहे. याठिकाणी पंचशील फाउंडेशनने "सीएसआर'च्या माध्यमातून ऑक्‍सिजन बेडस्‌ आणि आयसीयू बेडचे हॉस्पिटल उभारण्याची तयारी दर्शविली आहे.

हे वाचा - पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्लाझ्मा थेरपीची सोय नसल्याने रुग्णांची परवड

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या इमारतीची पाहणी केल्यानंतर हे हॉस्पिटल चालविण्यासाठी महापालिकेच्या वतीने डॉक्‍टर्स, कर्मचाऱ्यांसह अत्यावश्‍यक सुविधा पुरविण्यासाठी जंबो हॉस्पिटलचे काम पाहणाऱ्या डॉ. भाकरे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे दर मागविले होते. त्यांनी प्रती बेड 1400 रुपये इतका दर दिला आहे. तर "सीओईपी' येथे उभारण्यात येणाऱ्या आठशे बेडच्या जंबो हॉस्पिटलसाठी हेच दर 2 हजार रुपये इतका आहे. सुरवातीच्या काळात या नवीन इमारतीतील बेडस्‌ वापरात आणले जाणार आहेत. यासाठीचा खर्च महापालिका करणार असून त्याला आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली, असे रासने यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: temprory covid hospital will built up in baner