थंडीमुळे उबदार कपडे खरेदीकडे कल

jagdale1.jpg
jagdale1.jpg
पुणे ः शहरात थंडीची चाहूल लागली आहे. शहरवासीयांची उबदार कपड्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी नेपाळी, तिबेटियन व हिमाचल प्रदेशमधील स्वेटर व अन्य उबदार कपड्यांचे विक्रेते हडपसरमध्ये दाखल झाले आहेत. किमतीत घासाघीस करता येत असल्याने ब्रॅन्डेड उबदार कपड्यांपेक्षा रस्त्यावरील या विक्रेत्यांकडेच उबदार कपडे खरेदीसाठी चोखंदळ ग्राहकांचा कल असल्याचे दिसून येते. त्यामुळे या स्टॉल परिसरात ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. सोलापूर व सासवड रस्त्यावर या विक्रेत्यांनी उबदार कपड्यांचे स्टॉल लावले आहेत. तेथे स्वेटर, टोपी, मफलर, कानपट्टी, जर्किन्स, लहान मुलांसाठी स्वेटर्स, हात-मोजे, पायमोजे, महिलांसाठीही विविध प्रकारचे स्वेटर्स आणि सर्वांसाठी विविध आकारातील आकर्षक डिझाईन्सच्या ब्लॅंकेटचे अनेक प्रकार येथे उपलब्ध आहेत. या सर्व कपड्यांची मांडणी अत्यंत आकर्षक पद्धतीने करण्यात आली असून स्वेटर्स व तत्सम उबदार कपड्यांच्या किमती लोकरीच्या दर्जानुसार 200 ते एक हजार रुपयांपर्यंत, तर महिलांचे स्वेटर 180 ते एक हजार रुपये, जर्किन्स 250 ते दीड हजार रुपयांपर्यंत आणि कानटोपी, मफलर 50 ते 300 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. या ठिकाणी उबदार कपडे विक्रीचे आठ स्टॉल असून, त्यापैकी काही स्टॉलधारक गेल्या अनेक वर्षांपासून नियमितपणे येत आहेत. आपल्याला येथील ग्राहक, बाजारपेठेची पूर्ण माहिती झाली असून, ग्राहकांच्या आवडी-निवडी समजावून घेऊन त्याप्रमाणे योग्य मालाचा पुरवठा करण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असल्याचे या स्टॉलधारकांनी सांगितले. गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून ही मंडळी पुण्यात स्वेटर विक्रीचा व्यवसाय करत आहेत. या व्यावसायिकांशी गप्पा मारताना ही मंडळी आता पुणेकरच झाली असल्याचे ठळकपणे लक्षात येते. आता मराठीसुद्धा बोलता येते --------------------- गेल्या सतरा वर्षांपासून पुण्यात स्वेटर विक्रीचा व्यवसाय करणारे अनिल थापा म्हणाले की, सतरा वर्षांपासून पुण्यात येऊन हा व्यवसाय करत आहे. माझ्या आई-वडिलांबरोबर मी पुण्यात आलो, माझे लहानपण पुण्यातच गेले. आता तर पुणे हेच माझे गाव आहे. नेपाळमधील सुरकेत हे थापा यांचे मूळ गाव. त्यांना भाषेबद्दल विचारले असता ते म्हणाले की, भाषेची अडचण कधीच आली नाही, कारण नेपाळी आणि हिंदी भाषेत फारसा फरक नाही. आता मला थोडीफार मराठीसुद्धा बोलता येते. पुण्यातला गणेशोत्सव मला विशेष आवडतो. मी दरवर्षी मिरवणुकीत आवर्जून सहभागी होत असतो. त्यांच्या गावाबद्दल विचारले असता ते म्हणाले की, गावाला माझी शेती आहे, पुण्यातले काम संपल्यानंतर तीन ते चार महिने मी गावाकडे जाऊन शेती करतो. ""कारखान्यांमध्ये मशिनवर तयार केलेले तसेच विणलेले स्वेटर्सही या स्टॉलवर उपलब्ध आहेत. शहर व ग्रामीण भागातील सामान्य ग्राहक चोखंदळ, चिकित्सक आणि काटकसरी आहेत. उत्तम दर्जाचा माल रास्त दरात उपलब्ध होत असल्याने ग्राहकांची गर्दी वाढत आहे.'' - संजय थापा, स्टॉलधारक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com