

तेंदूपत्ता व्यवहारात
१.७३ कोटींची फसवणूक
पश्चिम बंगालमधील व्यापाऱ्याविरुद्ध रामनगर पोलिसांत गुन्हा
ॲग्रोवन वृत्तसेवा
गोंदिया : तेंदूपत्ता खरेदी-विक्री व्यवहारात विश्वास संपादन करून १ कोटी ७३ लाख ३ हजार २९२ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पश्चिम बंगालमधील दोन व्यापाऱ्यांविरुद्ध रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनेक वर्षांच्या व्यावसायिक संबंधांचा गैरफायदा घेत माल स्वीकारल्यानंतर रक्कम न दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
रामनगर येथील स्नेहल विपिन पटेल (वय ५०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची श्रीजी एंटरप्रायझेस ही कंपनी तेंदूपत्ता व्यापार व निर्यात व्यवसायात कार्यरत आहे. पश्चिम बंगालमधील एम. आर. एंटरप्रायझेस व जिनायरी बीडी फॅक्टरी प्रा. लि. या कंपन्यांचे संचालक डोलीनूर नेसा (४२) व अब्दुल कादीर शेख (४५, दोघेही रा. हिंगलगंज, जिल्हा मुर्शिदाबाद, पश्चिम बंगाल) यांच्याशी गेल्या आठ ते दहा वर्षांपासून व्यावसायिक संबंध होते.
तक्रारीनुसार, ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२२ मध्ये ५०.३९ लाख रुपयांचा तेंदूपत्ता पुरवठा करण्यात आला. त्यापैकी ११ लाख रुपये अदा करण्यात आले. त्यानंतर फेब्रुवारी २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत पुन्हा १ कोटी २२ लाख ६४ हजार ६१६ रुपयांचा तेंदूपत्ता पाठविण्यात आला. अशा प्रकारे एकूण व्यवहार २ कोटी ३ लाख ३ हजार २९२ रुपयांवर पोहोचला. यापैकी आरोपींकडून केवळ ३० लाख रुपये अदा करण्यात आले असून १ कोटी ७३ लाख ३ हजार २९२ रुपये थकविल्याचा आरोप आहे. वारंवार पाठपुरावा, दूरध्वनी संपर्क आणि प्रत्यक्ष भेटी करूनही प्रतिसाद न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली.
रामनगर पोलिसांनी आरोपी डोलीनूर नेसा व अब्दुल कादीर शेख यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(२), ३१८(३), ३१६(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदविला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किशोर राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नागरगोजे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.