Rutuja Bhosale : आता लक्ष ऑलिंपिक स्पर्धेकडे! भारतीय टेनिसपट्टू ऋतुजा भोसलेंचा संकल्प

टेनिस खेळातच करिअर करण्याचा माझा लहानपणापासूनचा मानस होता. मात्र मध्येच टेनिसला बाय बाय करत शिक्षणासाठी अमेरिकेला जावे लागले.
tennis player rutuja bhosale
tennis player rutuja bhosalesakal

पुणे - टेनिस खेळातच करिअर करण्याचा माझा लहानपणापासूनचा मानस होता. मात्र मध्येच टेनिसला बाय बाय करत शिक्षणासाठी अमेरिकेला जावे लागले. परंतु अमेरिकेत गेल्यावर टेनिसमध्येच करिअर करण्याची तीव्र भावना निर्माण झाली आणि या भावनेतूनच अमेरिकेतून भारतात परत येत, पुन्हा टेनिसचा श्रीगणेशा केला.

यामुळे देशासाठी पदक जिंकणे, हे माझ्यासाठी सोपे नव्हते. परंतु योग्य मार्गदर्शन आणि अपार मेहनतीमुळे हे शक्य झाले आणि मी सुवर्ण पदक जिंकू शकले, असा अनुभव भारतीय टेनिसपट्टू आणि अशियाई टेनिस स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेती ऋतुजा भोसले हिने गुरुवारी (ता.१२) येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला. माझे पुढचे लक्ष हे आगामी ऑलिंपिक स्पर्धेकडे असल्याचे तीने यावेळी स्पष्ट केले.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आज भोसले हिच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. या वार्तालापप्रसंगी ती बोलत होती. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, सरचिटणीस सुकृत मोकाशी, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशनचे मानद सचिव सुंदर अय्यर आदी उपस्थित होते.

ती पुढे म्हणाली, ‘या स्पर्धेत प्रार्थना ठोंबरे, मी आणि अंकिता रैना अशा तीन महिला टेनिसपट्टू सहभागी झाल्या होत्या. मिश्र दुहेरीच्या लढतीसाठी रोहन बोपन्नाने माझी निवड केली, त्यावेळी मला खूप आनंद झाला. अंतिम सामन्याचा पहिला सेट आम्ही हरलो.

त्यावेळी रोहनने केलेले मार्गदर्शन आणि दिलेल्या प्रोत्साहनामुळे आम्हाला सहज सुवर्णपदक पटकावीत देशाचे राष्ट्रगीत व तिरंगा परदेशात फडकावता आला. तो क्षण माझ्यासाठी खूप भावनिक होता. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी तीन सामने मी खेळले. त्यामुळे शारीरिक वेदना अधिक होत होत्या. दुसऱ्या दिवशी एक ब्रांझ पदक पटकावले.’’

आगामी काळात ऑस्ट्रेलियन ओपनबरोबरच ऑलिंपिक स्पर्धाही येत आहेत. त्याची तयारी आत्तापासूनच करणार असून स्पोर्टस सायन्समधील अत्याधुनिक तंत्राचा उपयोग करीत आहारावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. रोजच्या सरावाचे नियोजन करण्यात आले आहे.

प्रशिक्षकांकडूनही वेळोवेळी योग्य मार्गदर्शन मिळत असून आगामी ऑलिंपिकचे ध्येय बाळगले आहे. या यशामध्ये वडील संभाजी भोसले, आई नीता भोसले आणि पती रणजीपट्टू स्वप्नील गुगळे यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे तिने यावेळी सांगितले.

‘चीनमध्ये भारतीय खेळाडूंचा सन्मान’

भारत आणि चीन यांच्यातील तणावपूर्ण संबंधांमुळे चीन येथे गेल्यावर खेळाडूंवर काही परिणाम झाला का, या प्रश्नाला उत्तर देताना एकंदरीत आम्हाला भारत-चीनमधील तणावपूर्ण संबंधांचा फारसा फरक जाणवला नाही. तेथील स्वयंसेवक भारतीय खेळाडूंच्या मदतीला सातत्याने उपस्थित राहत असत. चीनच्या आयोजकांकडूनही भारतीय खेळाडूंची चांगली काळजी घेण्यात आल्याचे ऋतुजा भोसले हिने यावेळी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com