दहावी-बारावीची परीक्षा ऑफलाइन होणार!!

परीक्षा घेण्याच्या दृष्टीने तयारी सुरू ; आठवडाभरात होणार निर्णय
Student_Exams
Student_Examssakal
Updated on

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने आता दहावी-बारावीच्या २०२२मध्ये होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा ऑफलाइन घेण्याचा शालेय शिक्षण विभागाचा विचार आहे. तसेच अचानकपणे कोरोनाचा संसर्ग वाढल्यास ऑनलाइन परीक्षा घेण्याच्या दृष्टीनेही सध्या चाचपणी सुरू आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीचा विचार करता परीक्षा ऑफलाइनच होतील आणि त्याबाबत आठवडाभरात निर्णय जाहीर होईल, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये दहावी-बारावीची परीक्षा घेण्यात येते. परंतु, मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने, यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव जाणविण्यापूर्वी बारावीचे पेपर झाले होते. तर दहावीचे शेवटच्या टप्प्यातील पेपर रद्द करण्यात आले होते. त्यानंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम राहिल्याने २०२१मध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा वारंवार पुढे ढकलण्यात येत होत्या. त्यानंतर अखेर मे-जून २०२१ मध्ये परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले.

आता कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने कमी होत असल्याने निदर्शनास येत आहे. त्यामुळे यंदा २०२२मध्ये होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा ऑफलाइन घेण्याबाबत राज्य पातळीवर चर्चा सुरू आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी नुकतीच शिक्षक, प्राचार्य, मुख्याध्यापक यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील अन्य मान्यवरांसमवेत परीक्षेच्या आयोजनाबाबत चर्चा केली. ऑफलाइन परीक्षा घेण्याला बैठकीत मान्यवरांनी दुजोरा दिला. ही परीक्षा ऑनलाइन घ्यायची झाल्यास, त्यादृष्टीने चाचपणी देखील करण्यात आली. परंतु राज्यभरातून ३० लाखांहून अधिक विद्यार्थी ही परीक्षा देतात. परीक्षेदरम्यान नेटवर्क, वीज पुरवठा खंडित होणे, पुरेसे साहित्य उपलब्ध न होणे अशा विविध समस्यांमुळे दहावी-बारावीची परीक्षा ऑनलाइन घेणे अशक्य असल्याची मते वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी मांडली. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षा ऑफलाइन घेण्याबाबत राज्य पातळीवर विचारविनियमय सुरू असून येत्या आठवडाभरात निर्णय जाहीर होणार असल्याची चिन्हे आहेत.

ऑफलाइन परीक्षा घेण्याच्या दृष्टीने तयारी सुरू

‘‘राज्य मंडळामार्फत गेल्यावर्षी दहावी-बारावीची परीक्षा ऑफलाइन घेण्याच्या दृष्टीने तयारी केली होती. कोरोनाच्या स्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रत्येक शाळेत परीक्षा घेण्याचे नियोजन केले होते. आता कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव राहिलेला नाही. त्यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घेण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. दरवर्षी जवळपास तीस लाखांहून अधिक विद्यार्थी दहावी-बारावीची परीक्षा देत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत माहिती देणे गरजेचे आहे. त्यामुळे आठवड्याभरातच परीक्षेबाबत निर्णय घेण्यात येईल.’’

- दिनकर पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com