दहशतवाद्यांचा वावर वाढतोय

पांडुरंग सरोदे
गुरुवार, 11 एप्रिल 2019

‘आयएम’, ‘सिमी’ सदस्यांचेही वास्तव्य
जर्मन बेकरी, जंगली महाराज रस्त्यावरील साखळी बाँबस्फोटातील इंडियन मुजाहिदीनच्या यासीन भटकळ, रियाज भटकळ यांच्यासह फरासखाना पोलिस ठाण्यासमोर बाँबस्फोट घडवून आणणारे स्टुडंट्‌स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडियाच्या (सिमी) शेख मेहबूब ऊर्फ गुड्डू शेख, अमजद रमजान शेख, झाकीर हुसैन बद्रील हुसैन यांनी पुण्यात वास्तव्य करून बाँबस्फोट घडवून आणले. त्यामुळे दहशतवाद्यांचे ‘स्लीपर सेल’च नव्हे, तर दहशतवादीही शहरात वास्तव्यास होते.

पुणे - बांगलादेशमध्ये बंदी असलेल्या दहशतवादी संघटनांशी संबंधित दहशतवाद्यांचा वावर पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये वाढल्याचे चित्र आहे.

पाकिस्तान त्यांचा वापर करून भारतामध्ये दहशतवादी कारवाया घडवीत असल्याची सद्यःस्थिती आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून मिळणाऱ्या माहितीद्वारे महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) बिहार, उत्तर प्रदेश ‘एटीएस’च्या मदतीने काही महिन्यांपासून केलेल्या कारवाईद्वारे ही बाब ठळकपणे पुढे आली आहे.

जर्मन बेकरी बाँबस्फोटानंतर पुणे शहर दहशतवाद्यांच्या ‘हिट लिस्ट’वर असल्याचे स्पष्ट झाले. आता पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये मागील काही वर्षांपासून दहशतवाद्यांना पाठबळ देणाऱ्या लोकांचा वावर वाढू लागला आहे. महाराष्ट्र व बिहार ‘एटीएस’ने २८ मार्चला केलेल्या कारवाईतून हे उघड झाले.

‘एटीएस’ने पुलवामा हल्ल्यातील संशयितांच्या संपर्कात असलेला शरीफ अन्वरउलहक मंडल (वय १९, बाजीपूर, नादिया, पश्‍चिम बंगाल) याला चाकणमधील खालुंब्रे गावातून अटक केली. मंडल हा इस्लामिक स्टेट ऑफ बांगलादेश (आयएसबीडी) आणि जमाल उल मुजाहिदीन या दोन दहशतवादी संघटनांसाठी मनुष्यबळ पुरविण्याची जबाबदारी पार पाडत असल्याची माहिती पुढे आली आहे.

वास्तव्य का?
  औद्योगिक वसाहतींमुळे रोजगार, निवारा 
  स्वस्तात निवास, भोजन व अन्य सोईसुविधा उपलब्ध 
  देशात कोठेही पळून जाण्याची साधने 
  भाषा, राहणीमान भारतीयांप्रमाणेच असल्याने संशयाची शक्‍यता कमी 

‘टेरर फंडिंग’चेही नेटवर्क पोहचले 
दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तानमधून येणारा पैसा (टेरर फंडिंग) भारताच्या वेगवेगळ्या भागात पोहचविणाऱ्या उत्तर प्रदेशातील टोळीप्रमुख रमेश शहा यास महाराष्ट्र व उत्तर प्रदेश ‘एटीएस’ने काही महिन्यांपूर्वी अटक केली. पोलिसांच्या भीतीने त्याने उत्तर प्रदेशमधून पलायन करून पुण्यात वास्तव्य केले होते. तो नेटकॉलिंगद्वारे दहशतवाद्यांच्या हॅंडलरशी संपर्कात होता. त्यांच्याकडून मिळणारे पैसे तो देशातील विविध राज्यांत दहशतवादी कृत्य घडवून आणण्यासाठी पोचवीत होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Terrorist Pune Pimpri Chinchwad Crime