बारामती प्री फॅब्रिकेटेड घरांची निर्मिती करण्याची चाचपणी सुरु

मिलिंद संगई
Friday, 27 November 2020

येत्या काही दिवसात बारामतीच्या बांधकाम क्षेत्रात आमूलाग्र बदल होण्याच्या दृष्टीने सध्या चाचपणी सुरु झाली आहे.

बारामती : येत्या काही दिवसात बारामतीच्या बांधकाम क्षेत्रात आमूलाग्र बदल होण्याच्या दृष्टीने सध्या चाचपणी सुरु झाली आहे. कमी वेळेत अधिक दर्जेदार प्री फॅब्रिकेटेड घरे उभारणीसाठी सॅटेक एनव्हीर इंजिनिअरिंग या कंपनीचे मार्गदर्शन घेण्याच्या दृष्टीने चर्चा सुरु झाली आहे. 

सिमेंट कॉंक्रीटच्या घरउभारणीत जाणारा वेळ कमी करुन विक्रमी वेळेत घर उभारणीसह इतरही अनेक फायदे मिळवून देणारी ही प्री फॅब्रिकेटेड घराची प्रणाली असून त्याचा वापर बारामतीत सुरु करण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरु झाली आहे. या संदर्भात या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव आगरवाल यांच्याशी संपर्क साधला असता, बारामतीत अशा प्रकारे घरनिर्मितीसाठी विचारणा झाली असून त्या बाबतचे प्रेझेंटेशनही सादर केल्याची माहिती त्यांनी दिली. 

ही घरे कारखान्यात तयार करुन थेट जागेवर आणून फक्त जोडली जातील, त्या मुळे अत्यंत कमी कालावधीत घरे उभारणी शक्य होणार आहे. बारामतीत विस्थापितांसह तात्पुरता निवारा कक्ष स्थापन करण्याच्या दृष्टीने अशी घरे उभारण्यासंदर्भात चाचपणी सुरु झाली आहे. 

तापमान नियंत्रित होते...
या घराच्या भिंतीमध्ये पॉलियुरीथीन फोम (पीएएफ) तंत्रज्ञान वापरले जाते. या मुळे उन्हाळ्यात घराच्या आतील बाजूस थंड तर हिवाळ्यात उष्णता कायम राहते. या मुळे सर्व प्रकारच्या प्रदेशात ही घरे उपयुक्त ठरतात. 

कशासाठी उपयुक्त....
•    पोर्टेबल केबिन्स
•    सिक्युरिटी केबिन्स
•    पोर्टेबल टॉयलेट
•    साईट ऑफिसेस
•    घरे व व्हिलाज
•    अल्पउत्पन्न गटातील घरे
•    कर्मचारी वसाहती
•    विस्थापितांसाठी घरे. 

काय आहेत प्री फॅब्रिकेटेड घराचे फायदे-
•    उत्तम दर्जा व अधिक आर्युमान 
•    संपूर्ण घर कारखान्यात बनून जागेवर आणून फक्त जोडले जाणार
•    एक मजला एका दिवसात तयार करण्याची क्षमता
•    बांधकाम व इतर बाबीत पाण्याचा वापर नगण्य त्या मुळे पाण्याची बचत
•    वाळूचा वापर नसल्याने पर्यावरणाचा –हास होत नाही 
•    बांधकाम करताना आसपासच्या लोकांना अजिबातच त्रास होत नाही
•    जोडणी करण्यासाठी मोजक्या कर्मचा-यात काम करणे शक्य
•    देखभाल दुरुस्तीचा खर्च नगण्य
•    बांधकामाचा राडारोड होत नाही, त्या मुळे स्वच्छता कायम राहते.
•    घरात भविष्यात काही बदल करायचे झाल्यास अत्यंत सोपी प्रक्रीया
•    या प्री फॅब्रिकेटेड घरात कार्पेट एरिया अधिक मिळतो, भिंत कॉलम रुंदी कमी असते. 
•    या मध्ये कोणत्याही स्वरुपाचे कसलेही बांधकाम करणे शक्य.

आम्ही कारखान्यात घर तयार करुन जागेवर आणून जोडतो, यात वेळेची प्रचंड बचत, उत्तम दर्जा, तुलनेने खर्च कमी, बांधकामाचा त्रास नाही, पर्यावरणपूरक असे अनेक फायदे होतात. अशी घरे आता काळाची गरज बनली आहेत.- 
गौरव आगरवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, सॅटेक एनव्हीर इंजिनिअरिंग.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Testing for construction of Baramati pre-fabricated houses started