लशीच्या वितरणसाठी चाचपणी; कोरोनावरील लसीसाठी शहरात माहितीचे संकलन

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 24 October 2020

या वर्षीच्या शेवटी किंवा पुढील वर्षीच्या सुरवातीला ही लस उपलब्ध होईल, अशी माहिती पुढे येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लस वितरणाची व्यवस्था उभारण्यासाठी सुरवात केली आहे.

पुणे : पुण्यात नेमक्‍या किती जणांना पहिल्या टप्प्यात कोरोना प्रतिबंधक लस द्यावी लागेल, याची माहिती संकलीत करण्यास महापालिकेने आता सुरवात केली आहे. शहरातील सरकारी, महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णसेवा करणाऱ्यांना सुरवातीला ही लस देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांची नेमकी संख्या या माहिती संकलनातून निश्‍चित होईल.

राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात सात महिन्यांपूर्वी आढळला. त्यानंतर या साथीचा मोठा उद्रेक पुण्यासह देशात झाला. आता कोरोनाच्या या साथीला नियंत्रित करण्यासाठी लस विकसित करण्यात येत आहे. एकाच वेळी तीन वेगवेगळ्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचण्या देशात सुरू आहेत. त्यापैकी एक लस पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटमध्ये विकसित होत आहे. त्याची मानवी चाचणी पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, भारती हॉस्पिटल आणि केईएम रुग्णालयाच्या वढू केंद्रावर सुरू आहेत.

या वर्षीच्या शेवटी किंवा पुढील वर्षीच्या सुरवातीला ही लस उपलब्ध होईल, अशी माहिती पुढे येत आहे. या पार्श्वभूमिवर केंद्र सरकारने लस वितरणाची व्यवस्था उभारण्यासाठी सुरवात केली आहे. त्या दृष्टीने वैद्यक क्षेत्रातील माहिती संकलनाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

 कोरोनाबाधितांच्या उपचारात असलेल्या डॉक्‍टर ते वॉर्डातील कर्मचऱ्यिापर्यंत पहिल्या टप्प्यात कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. या सर्वांची नेमकी संख्या किती याची माहिती संकलन सुरू आहे. केंद्र सरकारने निश्‍चित केलेल्या पद्धतीने हे काम सुरू आहे. यासाठी खासगी रुग्णालयांनाही पत्र पाठविण्यात आले आहे.
- डॉ. आशिष भारती, आरोग्य विभागप्रमुख, पुणे महापालिका

खासगी डॉक्‍टरांनाही वितरण
पुण्यातील 78 टक्के कोरोनाबाधितांवर खासगी रुग्णालयांमधून उपचार करण्यात आले असल्याची अधिकृत माहिती जिल्हा प्रशासनातर्फे प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे या लसीकरणात खासगी डॉक्‍टरांचाही समावेश करण्यात आल्याची माहिती, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Testing for vaccine delivery city continues to collect information