बोरी बुद्रुकमध्ये बिबट्याचा दुचाकीस्वारावर पुन्हा हल्ला

बोरी बुद्रुकमध्ये बिबट्याचा 
दुचाकीस्वारावर पुन्हा हल्ला
Published on: 

महिनाभरात दुचाकीस्वारांवरील हल्ल्याची तिसरी घटना; ठाकरवाडी परिसरात भीतीचे वातावरण, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
आळेफाटा, ता. १३ : बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथील ठाकरवाडीजवळील कालवा परिसरात दुचाकीवरून घरी जात असलेल्या नितीन उमाजी जाधव यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यात त्यांच्या पायाला दुखापत झाली असून, त्यांना उपचारासाठी नारायणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
महिनाभरात दुचाकीस्वारांवर बिबट्याने हल्ला करण्याची ही तिसरी घटना असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी नितीन जाधव यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
बोरी बुद्रुक परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात ऊसतोड सुरू आहे. त्यामुळे बिबट्यांचा अधिवास विस्कळीत होत असून, त्यांचा मानवी वस्तीजवळील वावर वाढत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी शेतातून, तसेच कालव्यालगतच्या रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांना बिबट्याचा धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान, शिंदेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत ठाकरवाडी परिसरातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी ये-जा करतात. याच मार्गावर बिबट्याचा वावर असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. पालकांमध्येही चिंतेचे वातावरण असून, विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होण्यापूर्वी वनविभागाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.