२१ विद्यार्थिनींच्या विनयभंगाची तक्रार दडपली ; अधीक्षिकेवर ठपका

२१ विद्यार्थिनींच्या विनयभंगाची तक्रार दडपली  ; अधीक्षिकेवर ठपका
Published on

‘त्या’ आश्रमशाळेतील
अधीक्षिकेवर ठपका
ठाणे जिल्ह्यातील प्रकार; मदतनीसावर निलंबनाची कारवाई
शहापूर (जि. ठाणे), ता. २८ : तालुक्यातील एका शासकीय आदिवासी आश्रमशाळेत २१ विद्यार्थिनींचा विनयभंग झाल्याचे उघडकीस आल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा जागी झाली आहे. आदिवासी विकास प्रकल्प विभागाने विद्यार्थिनींच्या विनयभंगाची तक्रार दडपल्याचा ठपका अधीक्षिका गौरी सारक्ते यांच्यावर ठेवला असून या घटनेला त्यांना जबाबदार धरण्यात आले आहे. तर मुलींचा विनयभंग करणारा स्वयंपाकगृहातील मदतनीस गणपत गवळी याला निलंबित केले आहे. विशेष म्हणजे अशाच गुन्ह्यातून गवळी याची निलंबित होण्याची ही दुसरी वेळ आहे.
शहापूरच्या आश्रमशाळेत काही दिवसांपूर्वी स्वयंपाकगृहात मदतनीस म्हणून काम करणाऱ्या गवळीने विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची घटना घडली होती. या मुली जेवण झाल्यानंतर ताट धुण्यासाठी जात असताना त्यांच्या अंगाला आरोपीने विचित्र पद्धतीने स्पर्श केले. त्यामुळे धास्तावलेल्या विद्यार्थिनींनी आश्रमशाळेच्या अधीक्षिका गौरी सारक्ते यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली; मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर या मुलींनी एका शिक्षकाला घडलेली घटना सांगितली. या शिक्षकाने आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे यांना हा प्रकार कळवला. त्यानंतर मुख्याध्यापक दीपक पाटील यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. विद्यार्थिनींच्या विनयभंगाची अधीक्षिका सारक्ते यांनी दखल न घेतल्याने चौकशी समितीने त्यांच्यावर तक्रार दडपल्याचा ठपका ठेवला आहे. या समितीत सहाय्यक प्रकल्प अधिकारी, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी व मुख्याध्यापिका यांचा समावेश आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे सुरू की बंद
आश्रमशाळेत दहा सीसीटीव्ही कॅमेरे आहेत; पण ते सुरू होते की बंद, असा प्रश्न निर्माण झाला असून फुटेज तपासण्यात आले होते का, असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. आश्रमशाळेत ३७५ मुले व मुली शिक्षण घेत असून विनयभंगाच्या संतापजनक घटनेमुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. आश्रमशाळेत संगणक कक्ष, डिजिटल वर्ग यांसह कोणत्याही आधुनिक सुविधा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com