
- महिमा ठोंबरे
पुणे, ता. २८ : ‘‘व्यंग्यचित्र हे एकांतात आनंद देणारे माध्यम आहे. तो काही ‘परफॉर्मिंग आर्ट’चा प्रकारच नाही. त्यामुळे या क्षेत्रातील कलाकारांना अन्य क्षेत्रांइतकी प्रसिद्धी मिळत नाही, हे साहजिकच आहे. उलट मी समोर नसतानाही माझे चित्र लोकांपर्यंत पोहचते आणि त्यांच्याशी ते संवाद साधते, याचा आनंद निराळाच आहे. चित्र कधीही एकदा पाहून संपत नाही. ते पुन्हा पुन्हा वेगवेगळे रूप घेऊन भेटत राहते, ही या माध्यमाची ताकद आहे,’’ हे सांगत होते, ९९ वर्षांचे चिरतरुण अन् सदा हसतमुख व्यक्तिमत्त्व... शि. द. फडणीस!
सुमारे सात दशकांपासून अधिक काळ मराठीजनांना आपल्या हास्यचित्रांनी भरभरून आनंद देणारे आणि निर्विष, निखळ विनोदाने हसवणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस सोमवारी (ता. २९) १००व्या वर्षात पदार्पण करत आहेत. यानिमित्त ‘सकाळ’ने त्यांच्याशी संवाद साधला. ‘‘केवळ मनोरंजन हा या माध्यमाचा उद्देश नाही. तसे असते तर मी हे माध्यम कधीच सोडून दिले असते. चित्र मनोरंजनापलीकडे आपल्याला बरेच काही देऊन जाते,’’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
चेहऱ्यावर नेहमीचे प्रसन्न हास्य कायम असलेले ‘शिद’ शंभरीच्या उंबरठ्यावरही आपला उत्साह आणि कुतूहल टिकवून आहेत. त्यांच्या शंभरीनिमित्त ‘शि. द. १००’ महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवातील प्रत्येक कार्यक्रमाची माहिती ‘शिदं’नी अगदी बारकाईने जाणून घेतली. आयोजक सारा तपशील सांगत असताना ‘सत्कार सोहळ्यात मी किती वेळ बोलायचे आहे’, हेही त्यांनी आवर्जून विचारले. ‘तुम्हाला काही वेळेचे बंधन नाही’, असे आयोजकांनी सांगताच ते प्रसन्न हसले.
व्यंग्यचित्रातील विनोदही निर्विषही असू शकतो, हे ‘शिदं’नी वारंवार सिद्ध केले. याविषयी विचारल्यावर ते म्हणतात, ‘‘हे माझेच प्रतिबिंब आहे, असे समजा. कारण, कोणाला दुखावण्यात मला कधीच आनंद वाटला नाही. माझे हास्यचित्र केवळ एखाद्या विसंगत विचारावर टीका करते. कोणताही माणूस ‘परफेक्ट’ नसतो; त्याच्या व्यक्तिमत्त्वात काहीतरी त्रुटी असतातच. त्या त्रुटी हास्यचित्रकाराला दिसतात, त्या वेळी तो फक्त त्यावर बोट ठेवतो.’’
माझ्या चित्रांप्रमाणेच मी देखील निःशब्द
‘शिदं’च्या शंभरीनिमित्त चार दिवसीय महोत्सव, त्यांचा जाहीर नागरी सत्कार आदी कार्यक्रम होणार आहेत. चित्रकलेच्या क्षेत्रातील अनेक मान्यवर, ‘शिदं’चे सुहृद, आप्तेष्ट, नातेवाईक या सोहळ्यासाठी परगावाहून आवर्जून येत आहेत. याविषयी विचारल्यावर ‘‘माझ्याविषयी सांगताना निःशब्द चित्रांचे चित्रकार’ अशी खासियत नेहमी सांगितली जाते. साऱ्यांचे प्रेम आणि उत्साह पाहून मी भावुक झालो आहे. इतका प्रकाशझोत स्वतःवर असण्याची मला सवय नाही. त्यामुळे आज मी माझ्या या चित्रांप्रमाणेच निःशब्द आहे,’’ अशी भावना शि. द. फडणीस यांनी व्यक्त केली.
चित्रांविषयी साक्षरता वाढते आहे
‘‘आपल्या समाजात संगीत, नाटक, चित्रपट ज्या प्रमाणात रुजले आहेत, तितक्या प्रमाणात चित्र रुजलेले नाही. पण गेल्या ३०-४० वर्षांत यात बदल होताना दिसतो आहे. प्रत्येकाला चित्र काढून पाहावेसे वाटते आहे. मी १९६५ मध्ये पुण्यात पहिल्यांदा प्रदर्शन आयोजित केले होते, त्यावेळी त्यासाठी स्वतंत्र कलादालनच नव्हते. आता मात्र अनेक कलादालने सुरू झाली आहेत. लोक तेथे चित्र पाहायला जात आहेत. हा बदल स्वागतार्ह आहे,’’ असे मत शि. द. फडणीस यांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.