
पुण्याच्या ११ वर्षीय लेखकाचे पुस्तक ठरतेय Best Selling Crime Novel
कोरोना महामारीच्या काळात लिहिलेली ‘मर्डर अॅट दि लिकी बॅरल’ हे जोशुआ बेजॉयचं पहिले पुस्तक. वयाच्या फक्त ११ व्या वर्षी त्याने हे पुस्तक लिहिले आहे. जुलैमध्ये प्रकाशित झालेेले हे पुस्तक हे भारत, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये अॅमेझॉन किंडलवर सर्वाधिक विकले जात असून हा जोशुआ हा क्राइम थ्रिलरच लेखक बनला आहे.

या पुस्तकातील कथानक आयर्लंडमधील आहे. खरंतर जोशुआने भारताबाहेर कधीही प्रवास केलेला नाही, परंतु कथेसाठी वास्तववादी वातावरण तयार करण्यासाठी त्याने आयर्लंडवर खूप संशोधन केले. तेथील रस्ते आणि ठिकाणांची माहिती मिळवण्यासाठी त्याने गुगल मॅप्सची मदत घेतली.
जोशुआचे आईवडील थॉमस आणि सुमा यांना माहित होते की, त्याला पुस्तके आवडतात, तो एक डायरी कायम सोबत बाळगतो आणि नेहमी त्यात काहीतरी लिहीत असतो. घरी किंवा बाहेर असतानाही तो नियमित नोट्स लिहीत असतो, परंतु तो कादंबरी लिहितोय, हे त्याच्या कल्पानाही माहिती नव्हतं. कादंबरीचा काही भाग लिहून झाल्यानंतर त्यांना याबद्दल समजले.
आयआयएसईआर पुणे येथे मानवीय आणि सामाजिक विज्ञान विभागातील सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे बेजॉय थॉमस म्हणतात, “ सुरुवातीला आम्हाला संशय वाटत होता की, त्याने लघुकथा लिहायला सुरुवात केली आहे पण तो आपले काम शेअर करु इच्छित नव्हता. लिखाणाबरोबरच त्याने काही व्यंगचित्रेही काढली होती. ”
“हे एका गूढ खुणाचं रहस्य असल्याने आमचे कुटुंब किंवा मित्र त्यावर कसे प्रतिक्रिया देतील, याबद्दल आम्ही साशंक होतो. जोशुआ असं लिहितोय यासाठी त्यांनी आम्हालाच दोषी ठरवले तर, अशी भीतीही आम्हाला वाटत होती.” असं सुमा म्हणाल्या. त्या पत्रकार आहेत आणि एका मल्याळम दैनिकात वित्त आणि अर्थव्यवस्थेबाबत लिहितात.
केरळमधील लोकप्रिय प्रकाशक करंट बुक्सने ‘मर्डर अॅट दि लिकी बॅरल’ चे मल्याळम भाषांतर प्रकाशित करणार असल्याचे जाहीर केले आहे आणि त्याचे ऑडिओबुकही तयार होत आहे.
जोशुआला हॅरी पॉटर मालिका आणि संगीत खूप आवडते. तो गिटारदेखील वाजवतो. या गोष्टी त्याला विचार करण्यास आणि लिहिण्यास मदत करतात. दरम्यान, जोशुआचे अजून दोन साहित्यिक प्रकारांवर काम सुरू आहे, पण ते खुनाचे रहस्य नाही, असे त्याने सांगितले.