
पुणे : कोथुर्णे येथील स्वरांजली चांदेकर या अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि तिच्या निर्घृण खूनाचा खटला केवळ दहा महिन्यांत निकाली काढण्यात आला. या गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर त्यावर जलदगतीने सुनावणी घेत द्रुतगती न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली.
तेजस ऊर्फ दादा महिपती दळवी (वय २४) असे नराधमाचे नाव आहे. त्याच्या आईलाही पुरावे नष्ट केल्याचा प्रयत्न केला म्हणून सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. मावळ तालुक्यात दोन ऑगस्ट २०२२ रोजी हा गुन्हा घडला होता. त्यानंतर तीन महिन्यांच्या आत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायवैद्यक प्रयोगशाळांचे अहवाल आल्यानंतर जलदगतीने सुनावणी घेण्यात आली. विशेष सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी खटल्याचे कामकाज पाहिले. गुन्हा सिद्ध करण्यासाठी त्यांनी एकूण २९ साक्षीदार तपासले. मुलीला आरोपीसोबत पाहणारी गावातील महिला, मुलीचे शवविच्छेदन आणि आरोपीची वैद्यकीय तपासणी करणारे डॉक्टर आणि आरोपीच्या घरझडतीच्या वेळी उपस्थित सरकारी पंच यांची साक्ष महत्त्वाची ठरली.
पोलिसांच्या चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली होती. आरोपीच्या घराच्या झडतीत खाटेवर आणि मोरीतील फरशी तसेच बादलीवर मुलीचे रक्त सापडले. याशिवाय आरोपीने वापरलेला चाकू, मुलीची जीन्स, तिच्या कानातील रिंगही आढळून आली होती. आरोपीने लैंगिक वासना शमविण्यासाठी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत तिचा खून केला असून, त्याला फाशीची शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद ॲड. कावेडिया यांनी केला. मुलीच्या आईवडिलांना नुकसान भरपाई देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला.
गुन्ह्याचा तपास चांगला होत गेल्याने दोषारोपपत्र आणि वैद्यकीय पुरावे वेळेत मिळाले. त्यामुळे खटला जलदगतीने चालविण्यास मदत झाली. गुन्हा सिद्ध करण्यासाठी विविध पुरावे महत्त्वाचे ठरले. त्यासाठी विविध न्यायनिवाड्यांचा संदर्भ देण्यात आला. नराधमाला इतक्या कमी वेळेत फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याने या खटल्याच्या निकालाच्या माध्यमातून समाजात चांगला संदेश जाणार आहे.
- ॲड. राजेश कावेडिया, विशेष सरकारी वकील
चार कलमांनुसार फाशी
३७६ (अ) - १२ वर्षांच्या आतील मुलीचा अत्याचारात मृत्यू झाला किंवा तिला जखमा झाल्या.
३७६ (अ, ब) - १२ वर्षांच्या आतील मुलीवर बलात्कार.
३०२ - खून
पॉक्सो (कलम ५) - १२ वर्षांखालील मुलीवर क्रूरपणे लैंगिक अत्याचार.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.