esakal | कोरोना बाधितांसह कुटुंबाला हवा मानसिक आधार

बोलून बातमी शोधा

Mental Support
कोरोना बाधितांसह कुटुंबाला हवा मानसिक आधार
sakal_logo
By
सम्राट कदम @namastesamrat

पुणे : कोरोना संबंधी उपचार चालू असताना आणि उपचारानंतरही रुग्णांच्या मानसिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होत आहे. तसेच, बाधितांच्या कुटुंबाचे स्वास्थ्यही या काळात मोठ्या प्रमाणावर बिघडत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा वेळी बाधितांसह त्यांच्या कुटुंबाला मानसिक आधार देण्याची गरज डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

उपचारादरम्यान विलगिकरणात राहणे, कुटुंबाची ताटातूट होणे, अपराधीपणाची भावना आणि कोरोना झालाय हे मनाने न स्वीकारणे, यामुळे रुग्णाच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो, अशी माहिती केईएम रूग्णालयाचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. निकेत कासार यांनी दिली. ते म्हणाले,‘‘कोरोनाच्या चक्रातून आपल्या सर्वांनाच जायचे आहे. बऱ्याचदा रूग्ण स्वतःला कोरोना झाल्याचे स्वीकारत नाही. परिणामी त्याचा मानसिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतो. कोरोनातून सावरलेल्या रुग्णांनाही पुन्हा कोरोना होईल का, अशी भीती आहे. तसेच आजूबाजूच्या वातावरणामुळे लोकांमध्ये एक भीतीची लाट आहे. त्याचा थेट परिणाम मानसिक स्वास्थ्यावर होतो.’’ कोरोनाचा आघात शरिराबरोबरच मनावरही मोठ्या प्रमाणावर होतो. अशा वेळी रुग्णाला मानसिक आधा द्यायला हवाच, त्याचबरोबर त्याच्या कुटुंबालाही समाजाने आधार द्यायला हवा.

मानसिक आजाराची लक्षणे :

 • - नैराश्य, काही करावेसे न वाटणे, शारिरिक थकवा जाणवणे.

 • - काळजी, चिंता, भीती, तीव्र कोटीचे दुःख

 • - शंकेखोर होणे, मंत्रचळ होणे

 • - उपचारा दरम्यान संभ्रमावस्था, चिडचिडेपणा

स्वास्थ्य सुधारण्यासाठी हे कराच...

१) रूग्ण

 • घाबरून न जाता शांतपणे रहा

 • रोजनिशी लिहा

 • मित्रांशी फोनवर बोला, गप्पा मारा

 • योगासने, ध्यान धारणा करा

२) कुटुंब आणि समाज

 • रूग्णाला मानसिक आणि भावनिक आधार द्या

 • आम्ही सोबत असल्याचे सांगा

 • रूग्णाबद्दल आणि कुटुंबाबद्दल सहानुभूती बाळगा

 • बाधित कुटुंबातील कोणी मृत्यू पावल्यास समाजाने भावनिक आधार द्यावा

 • या काळात कुटुंबाच्या आवश्यक अडचणींना समाजाने सोडवावे

''कोरोना काळात कुटुंबात एकमेकांना धीर द्यावा आणि समाजाने कुटुंबाला धीर देणे आवश्यक आहे. दुर्दैवाने च्या घरात काही वाईट घडले तर अधिक लक्ष द्यायला हवे. रुग्णाची लक्षणे अधिकच तीव्र असल्यास मनोविकार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.''

- डॉ. राहुल बागले, मनोविकार तज्ज्ञ, अपोलो रूग्णालय, पुणे

''कोरोनातील विलगिकरणामुळे रुग्णाची मानसिकता खचते, कुटुंबालाही भीतीने ग्रासल्यासारखे होते. सध्या १० पैकी तीन ते चार कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना मंत्रचळाची समस्या जाणवते. अशा वेळी दोघांच्याही मानसिक स्वास्थ्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.''

- डॉ. निकेत कासार, मनोविकार तज्ज्ञ