पिंपळगाव- जोगा कालव्याला कचराकुंडीचे स्वरूप

पिंपळगाव- जोगा कालव्याला कचराकुंडीचे स्वरूप

आळेफाटा, ता. ८ ः आळेफाटा (ता.जुन्नर) या ठिकाणाहून गेलेल्या पिंपळगाव-जोगा धरणाच्या डावा कालव्यात कचरा साचला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली असून कचराकुंडीचे स्वरूप आले आहे.

पुणे-नाशिक व नगर-कल्याण या दोन राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या आळेफाटा या ठिकाणी मोठी बाजारपेठ आहे. येथील काही नागरिक रात्रीच्या वेळी कालव्यात व कडेला कचरा टाकतात. ग्रामपंचायत हद्दीतील सगळा कचरा गोळा करण्यासाठी ग्रामपंचायतीने स्वतंत्र यंत्रणा (घंटागाडीची)सोय केली असून देखील कालव्यात कचरा टाकला जातो. तसेच या कालव्याच्या काही फुटांच्या अंतरावर शिवछत्रपती विद्यालय व जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेत जवळपास सहाशे ते सातशे विद्यार्थी शिक्षण घेत असून या कालव्याच्या कडेला प्लास्टिक, शिळे अन्न कुजलेल्या अवस्थेत पडलेले आहे. या ठिकाणी दुर्गंधी येत आहे.

कचरा टाकण्याच्या प्रमाणात वाढ
या कालव्याच्या दोन्ही बाजूने तसेच कालव्यातसुद्धा कचरा टाकलेला दिसून येत आहे. येथील ग्रामपंचायतीच्या वतीने तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी कालव्यात कचरा टाकू नका अशा सूचना देत असताना देखील या कालव्यात कचरा टाकण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललेले दिसून येत आहे.

ग्रामपंचायतीने कारवाई करावी
सध्या पावसाला सुरुवात झाली असून पावसाचे पाणी कचऱ्यात साचत आहे. हा कचरा सडू लागल्याने या परिसरात रोगराईचे प्रमाण वाढणार आहे. तरी या कालव्यात जे नागरिक कचरा टाकत आहेत. त्यांच्यावर ग्रामपंचायतीने कडक कारवाई करावी, अशी मागणी आळेफाटा रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com