

Pune Grand Tour 2026
esakal
पुणे : ‘पुणे ग्रँड टूर २०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता.२३) शहरातील प्रमुख मार्गांवरील विशेषत: मध्यवर्ती भागातील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी केले आहे. स्पर्धेच्या मार्गांबाबत अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील आणि पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यानुसार शेवटच्या चौथ्या टप्प्यातील स्पर्धा २३ जानेवारी रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ४ या वेळेत होणार आहे. स्पर्धेचा प्रारंभ बालेवाडी- म्हाळुंगेतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातून दुपारी १२ वाजता होणार आहे. समारोप बालगंधर्व रंगमंदिराजवळ होणार आहे. या कालावधीत शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्त्यावरील वाहतूक बंद राहील. स्पर्धेच्या मार्गांवरील रस्ते अर्ध्या तासासाठी बंद राहतील. स्पर्धक पुढे गेल्यानंतर वाहतूक टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येणार आहे.