esakal | राष्ट्रवादीच्या ‘त्या’ नगरसेवकांची कानउघाडणी
sakal

बोलून बातमी शोधा

ajit pawar

राष्ट्रवादीच्या ‘त्या’ नगरसेवकांची कानउघाडणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे: पक्षाचे नेते काय भूमिका घेतात, याकडे लक्ष द्यायाचे नाही. स्वत:ला वाटेल ते करायचे, हे अजिबात खपवून घेतला जाणार नाही,’’ अशा शब्दात अजित पवार यांनी महापालिकेतील स्थायी समितीमधील पक्षाच्या ‘त्या’ तीन सदस्यांची (नगरसेवक) शुक्रवारी कानउघडणी केली.

महापालिकेला ठेकेदारी पद्धतीने सुरक्षारक्षक नेमण्याचे काम भाजप नेत्याच्या ‘क्रिस्टल इंटिग्रेटेड सव्र्हिसेस प्रा.लि.’या कंपनीला देण्याच्या बाजूने स्थायी समितीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी मतदान केले. वास्तविक या प्रस्तावाला विरोध करण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला होता. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी देखील या प्रस्तावाबाबत पक्षाची भूमिका मांडली होती. मात्र, पक्षाच्या समितीतील सदस्यांनी प्रस्तावाला पाठिंबा दिल्याने जगताप यांनी या तिन्ही सदस्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे.

दरम्यान, पवार शुक्रवारी पुण्यात आले होते. त्यावेळी जगताप आणि स्थायी समितीतील पक्षाच्या तीन सदस्यांनी त्यांची भेट घेतली. या वेळी पक्ष विरोधी भूमिका घेतल्याबद्दल पवार यांनी या सदस्यांची खरडपट्टी केली.

पवार म्हणाले, ‘‘असला फालतूपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही. पक्षाचे नेते काय सांगतात, त्याकडे लक्ष द्यायाचे नाही. स्वत:ला वाटेल ती भूमिका घ्यायची आणि निवडणूका जवळ आल्या की पक्षाकडे तिकिटासाठी भांडायचे. तुमच्या चुकीच्या वागण्यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होते. येथून पुढे असलेले प्रकार खपवून घेतले जाणार नाही.’’

सीसीटीव्ही तपासणीतून शहानिशा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यकारिणीत एकत्रित चर्चा करून निर्णय घेतले जातात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जी भूमिका घेतील, ती पक्षाची भूमिका असेल. शहराच्या हितासाठी विकासकामांमध्ये राजकारण न आणता एकमेकांना सहकार्य केले पाहिजे. परंतु, काही चुकीचे घडत असेल, तर त्याला पक्षाचा पाठिंबा राहणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

स्थायी समितीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी एका भाजप नेत्याच्या कंपनीला कंत्राट देण्याच्या बाजूने मतदान केले होते. शहराध्यक्षांनी या बैठकीचे सीसीटीव्ही फुटेज घेतल्याचे म्हटले होते. याबाबत पवार म्हणाले, ‘‘या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासणे म्हणजे गैरविश्वास दाखवणे असे नाही. त्याचा वेगळा अर्थ काढू नका. आम्ही त्या नगरसेवकांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले आहे. आम्ही जनतेला शब्द दिलेला आहे. परंतु, एखादा सहकारी चुकीचे वागत असल्यास शहानिशा करून घेणे आमचे काम आहे आणि आम्ही ते करणार.’’

loading image
go to top