कात्रज - कात्रज-कोंढवा रस्त्यावरील सर्वे नंवर १९ पार्ट येथील अॅमेनिटी स्पेसवर ई-लर्निंग शाळेचे काम मागील आठ वर्षांपासून सुरु आहे. मात्र, आता नागरिकांची प्रतिक्षा संपली असून ही शाळा जूनमध्ये सुरु होणार असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आहे. तशा पद्धतीने तयारीचे आदेश महापालिका आयुक्तांकडून विद्युत विभाग आणि शिक्षण विभागाला देण्यात आलेले आहेत.
संबंधित शाळेच्या इमारतीला २०१५ मध्ये तळ मजल्याव्यतिरिक्त ५ मजले अशी परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर २०१६मध्ये सदर कामाचे भूमीपूजन करण्यात आले आणि प्रत्यक्ष कामास सुरवात झाली. सद्यस्थितीत याठिकाणी लोअर ग्राउंड, लोअर पार्किंग, अप्पर ग्राउंड व पहिला मजला पूर्ण झाला आहे.
दुस-या मजल्याचे काम सुरु आहे. २०१६ ते २०२४ पर्यंत टप्प्याटप्प्यांत निधी उपलव्ध झाल्याने हे काम रेंगाळले होते. आता एकुण १८ वर्गखोल्या व स्वच्छतागृहाचे कामे पुर्ण करण्यात येणार आहे.
एप्रिल २०२५पूर्वी महापालिका आयुक्तांनी भवन रचना विभागाला काम पूर्ण करुन दोन मजल्यांसह शाळेची इमारत हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर भवन रचना विभागाकडून कामाला गती देण्यात आली आहे. इमारतीचे दोन मजले वापरायोग्य पुर्ण करण्याच्या दृष्टीने काम सुरु आहे.
एप्रिल २०२५ पुर्वी काम पूर्ण होईल या उद्देशाने दोन मजल्यांवर शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याची कार्यवाही करावी' असेही आदेश शिक्षण विभागालाही दिले आहेत. त्याचबरोबर, या इमारतीची विद्युतविषयक कामे करण्यासाठी शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने विद्युतविषयक कामांचे पुर्वगणनपत्रक व निविदा प्रक्रिया राबविण्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या शैक्षणिक वर्षात जूनमध्ये किमान दोन मजल्यांवर शाळा सुरु होणार हे निश्चित झाले आहे.
प्रतिक्रिया
महापालिका आयुक्त यांनी सदर इमारतीचे उर्वरीत काम एप्रिल २०२५ पुर्वी पुर्ण करावे व आवश्यकते प्रमाणे पार्ट ऑकेपेशन देऊन शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याची कार्यवाही करावी 'असे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार, काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने आमच्या खात्याकडून कार्यवाही सुरू असून पुढील तीन महिन्यात दोन मजल्यांचे संबंधित विभागाकडे हस्तांतरण करण्यात येणार आहे.
- बापू बारवकर, कनिष्ठ अभियंता, भवन रचना विभाग
सदर ई-लर्निंग शाळेचा लाभ सुखसागरनगर, साईनगर, गोकुळनगर, शिवशंभोनगर, काकडेवस्ती, टिळेकरनगर व कात्रज परिसरातील गोरगरीब विद्यार्थ्यांना होणार आहे. यासाठी आम्ही भूमीपूजन करण्यापासून ते निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील होतो. मात्र, काही अडचणींमुळे काम रेंगाळत गेले. आता किमान दोन मजल्यांचे तरी काम पूर्णत्वास जात असून त्याचा फायदा परिसरातील गरीब होतकरु विद्यार्थ्यांना होईल याचा आनंद आहे.
- प्रतिक कदम, अध्यक्ष, प्रगती फाऊंडेशन.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.