‘मिलर फिशर सिंड्रोम’वर तरुणाने केली मात

‘मिलर फिशर सिंड्रोम’वर तरुणाने केली मात

पुणे, ता. १५ : अवघ्या ३३ वर्षीय पुणेकर तरुणाला चालताना अचानकपणे त्रास जाणवू लागला. आपल्याला नेहमीप्रमाणे व्यवस्थित चालता येत नसल्याचे त्याला जाणवले. त्यानंतर हात-पाय बधीर होऊ लागले. त्यामुळे रुग्ण तातडीने डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी बारकाईने तपासणी करताना रुग्णाला पापण्यांची उघडझाप करायला त्रास होत आहे. तसेच, कोणताही पदार्थ सहजासहजी गिळता येत नाही, अशी लक्षणे दिसली. त्यावरून रुग्णाला अत्यंत दुर्मिळ मेंदूविकार असलेल्या ‘मिलर फिशर सिंड्रोम’चे निदान झाले.
काय आहे हा आजार?
या रुग्णाला ‘गुलियन बॅरे सिंड्रोम’चा (जीबीएस) दुर्मिळ असा प्रकार असलेला ‘मिलर फिशर सिंड्रोम’ (एमएफएस) असल्याचा संशय डॉक्टरांना आला. ‘एमएफएस’ हा एक दुर्मिळ मेंदूविकार आहे. दरवर्षी या आजाराचे एक दशलक्ष लोकांपैकी केवळ एक किंवा दोन रुग्ण आढळतात. हा आजार विषाणूंच्या संसर्गानंतर चार आठवड्यांपर्यंत होतो. ‘ऑटोइम्युन’ आजारातील हा प्रकार असल्याने तो मज्जातंतूवर हल्ला करतो. यामुळे डोळ्याच्या रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. डोळ्यांची हालचाल करताना त्रास जाणवतो. तसेच सांध्यांची हालचाल कठीण होऊन अस्थिरता येते. यामध्ये कधी-कधी ‘जीबीएस’ होऊन चेहरा, गिळण्याची क्रिया किंवा सांध्यांमध्ये अशक्तपणा अशीही लक्षणे दिसू लागतात. काही रुग्णांमध्ये हा आजार वेगाने बळावून श्‍वास घेण्यास त्रास होता. यावर उपाय म्हणून व्हेंटिलेटरची गरज भासते.

असे केले निदान आणि उपचार
मणिपाल रुग्णालयामध्ये दाखल होण्यापूर्वी रुग्णाने इतरत्र ‘एमआरआय स्कॅन’ केले होते. या स्कॅनमधून कोणताही बदल दिसत नव्हता. मात्र, रुग्णाला आजाराची लक्षणे लक्षणे स्पष्ट दिसत होती. रुग्णालयातील मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. श्रुती वडके यांनी लक्षणांच्या आधारावर आजाराचे वेळेत निदान केले. डॉ. वडके यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने वेगाने हालचाल करून इम्युनोग्लोब्युलिन्सचे उपचार सुरू केले. या औषधांमुळे रोगप्रतिकारशक्तीवर नियंत्रण येऊन रक्तातील रक्तवाहिन्यांवर हल्ला करणाऱ्या जी घातक प्रतिपिडांवर (ॲन्टीबॉडीज) नियंत्रण मिळविणे शक्य झाले. या उपचाराला रुग्णाच्या शरीराने प्रतिसाद दिला. तो रुग्ण लवकर बरा झाला आणि कोणत्याही अपंगत्वाशिवाय घरी पाठवण्यात वैद्यकीय तज्ज्ञांना यश आले.

‘‘दुर्मिळ मेंदूविकार असलेल्या ‘एमएफएस’चे निदान करणे खूपच आव्हानात्मक असते. कारण, याची लक्षणे वेगळ्या आजारांप्रमाणे असल्याने चुकीचे निदान होऊ शकते. लवकरात लवकर निदान आणि उपचार होणे हा यातील महत्त्वाचा भाग असतो. असे न झाल्यास आजार वाढून गुंतागुंतसुद्धा वाढू शकते. हे टाळल्यास भविष्यातील अपंगत्वही टाळता येते.’’
- डॉ. श्रुती वडके, मेंदूविकार तज्ज्ञ, मणिपाल रुग्णालय, बाणेर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com