
पुणे शहराला येत्या १६ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक
पुणे - पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या संयुक्त खडकवासला प्रकल्पांतील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांमध्ये मिळून १९ मे अखेर एकूण ७.७५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. यापैकी सुमारे अडीच टीएमसी पाणी पुणे शहरासाठी राखीव आहे. हा पाणीसाठा शहराला येत्या १६ जुलैपर्यंत पुरेल इतका आहे. यामुळे पुणेकरांना यंदाच्या उन्हाळ्यात शहराला पाणी टंचाईचा मुकाबला करावा लागणार नसल्याचे उघड झाले आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या शिल्लक असलेल्या उपयुक्त पाणीसाठ्याच्या आकडेवारीचा अहवाल जलसंपदा विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालातून ही बाब उघड झाली आहे. पुणे शहराला दरमहा सरासरी सव्वा टीएमसी पाणी आवश्यक आहे. त्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील एकूण शिल्लक पाणीसाठा, शहरासाठी राखीव कोटा, आणि दरमहा आवश्यक पाणी यांच्या आकडेवारीची तुलना केल्यास, शहराला आणखी किमान दोन महिने पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
गेल्या वर्षी याच तारखेपर्यंत या चार धरणांमध्ये मिळून ९.८२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला होता. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा २.०७ टीएमसी इतका कमी झाला असल्याचे जलसंपदा विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. जलसंपदा विभागाकडून पुणे शहराला वर्षाला सुमारे ११.५ टीएमसी इतका पाण्याचा कोटा मंजूर आहे. प्रत्यक्षात वर्षाला सुमारे १६ टीएमसी पाणी वापर पुणे शहराकडून केला जात आहे. प्रत्यक्ष पाणी वापराच्या संख्येचे समान बारा भाग केल्यास, शहराला महिन्याला दरमहा सुमारे १.३३ टीएमसी पाणी आवश्यक असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.
शहराला खडकवासला संयुक्त प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांतून पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा केला जातो. या चार धरणांमधील मिळून एकूण उपयुक्त पाणीसाठा हा २९.१५ टीएमसी इतका आहे. याशिवाय या धरणांमध्ये मिळून १.९१ टीएमसी हा अचल पाणीसाठा शिल्लक आहे. यानुसार या चार धरणांमधील एकूण पाणीसाठा हा ३१.०६ टीएमसी इतका आहे.
सध्या उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यापैकी सुमारे १ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होईल, असे गृहित धरले आहे. उर्वरित ६.७५ पैकी सिंचनासाठी सव्वाचार टीएमसी पाणी राखीव असणार आहे. त्यामुळे शहरासाठी अडीच टीएमसी इतके पाणी राखीव राहिले असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले,
धरणनिहाय शिल्लक उपयुक्त पाणीसाठा (टीएमसीमध्ये)
खडकवासला --- ०.७१
टेमघर --- ०.३५
वरसगाव --- ३.५७
पानशेत --- ३.१२
एकूण उपयुक्त पाणीसाठा --- ७.७५
गतवर्षी या तारखेपर्यंतचा शिल्लक पाणीसाठा --- ९.८२
गतवर्षीच्या तुलनेत कमी झालेला पाणीसाठा --- २.०७
चार धरणांतील एकूण उपयुक्त पाणीसाठा --- २९.१५
चार धरणांमधील एकूण अचल पाणीसाठा --- १.९१
चार धरणांमधील एकूण साठा --- ३१.०६