मानले पाहिेजे राव ! पुण्यातील 'या' सोसायटीत एकही कोरोना रूग्ण नाही

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 September 2020

विमाननगर भागातील कोणार्क नगर सोसायटीत  अद्याप एक ही कोरोना रुग्ण न  आढळलेल्या सोसायटीचे परिसरात कौतुक केले जात आहे.

रामवाडी : विमाननगर भागातील कोणार्क नगर सोसायटीत अद्याप एकही कोरोना रुग्ण न आढळलेल्या सोसायटीचे परिसरात कौतुक केले जात आहे.

दरम्यान, 518 सदनिका असलेल्या या सोसायटीची मार्च महिन्यापासून, दक्षता घेतल्याने आतमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला नाही. सलग चार महिने दररोज सोसायटीमध्ये सॅनिटायझेशन केले जात होते. सध्या ते तीन दिवसांनी केले जात आहे. मास्क बांधणे, अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडणे या नियमांचे सर्वांनी पालन केले.

दररोज लागणारा भाजीपाला फळे बारामती, शिरूर या भागातून रहिवाशांसाठी मागवण्यात येत आहे. दुध तसेच डेअरी प्रॉडक्टची सोय सोसायटीच्या आतमध्ये करण्यात आली आहे. 15 जुलै पर्यत  कामवाली, कुक यांना सोसायटीमध्ये कामाला येण्यास बंदी घातली होती. रहिवाशांच्या काही अडचणी व वयानुसार घरातील कामे करता येत नसल्याने या कामवाल्या महिलांना सोसायटीच्या आतमध्ये प्रवेश सुरु झाला असला तरी सोसायटीच्या गेट बाहेर त्यांची ऑक्सिजन लेवल व शरीराचे तापमान तपासणे, तोंडाला बांधण्यासाठी त्यांना मास्क देणे तसेच त्यांचे हात सॅनिटायझर करणे या गोष्टींचे आजही कटाक्षाने पालन केले जात आहे.

सोसायटीतील होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्यानुसार आयुर्वेदीक औषध व काढा तसेच वाफ घेणे आजही सुरु आहे. जेष्ठ नागरिक सोसायटीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहे. परवानगी शिवाय कोणी बाहेर जात नाही. बाहेरची व्यक्ती आतमध्ये येऊ शकत नाही. या सर्व नियमांचे पालन रहिवाशांकडून केले जात असल्याने सहा महिने झाले एकही कोरोना रुग्ण या सोसायटीमध्ये आढळला नाही.

कोरोनाला प्रवेश द्वारा  बाहेर रोखण्यात आमच्या  सोसायटीला यश मिळाले  ते सर्व रहिवाशांच्या सहकार्यामुळे. सर्वजण नियमांचे पालन करत आहे स्वतः बरोबर इतरांची काळजी घेत आहे.-संदीप सिंग, सोसायटीचे अध्यक्ष 

(संपादन सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is no corona patient in Konark Nagar Society