पुण्यातील वधू-वर पित्यांसाठी खूशखबर; लग्नसोहळ्यासाठीच्या अटी ठरल्या

पुण्यातील वधू-वर पित्यांसाठी खूशखबर; लग्नसोहळ्यासाठीच्या अटी ठरल्या

पुणे : वधू-वर पित्यांना खूषखबर ! कोरोनाच्या काळात आयोजित केलेल्या लग्न समारंभाची सीडी स्थानिक पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडे देण्याची गरज नाही, असे स्पष्टीकरण महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी गुरुवारी केले. मात्र, आरोग्य राखण्यासाठी राज्य सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक असेल, असेही त्यांनी नमूद केले. 

मिशन बिगिन अगेनच्या चौथ्या टप्प्यातील लग्न समारंभासाठी राज्य सरकारने अनेक अटी घातल्या आहेत. मात्र, स्थानिक परिस्थितीनुसार त्यात बदल करण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना दिले आहेत. मात्र, त्याबाबत गैरसमज पसरल्यामुळे महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी विक्रम कुमार यांची भेट घेतली. त्यावेळी लग्न समारंभासाठी 50 व्यक्तिंनी उपस्थित राहण्याची मर्यादा असली तरी, फक्त वधू- वर पक्षाच्या लोकांचा समावेश असेल. भटजी, वाढपी आदींचा त्यात समावेश नसेल.

तसेच त्यासाठी पोलिस परवानगीची गरज नसून लग्न सोहळ्याच्या चित्रीकरणाची सीडी पोलिस ठाण्यात जमा करायची नाही, असे स्पष्टीकरण आयुक्तांनी केले. लग्न समारंभासाठी उपस्थित असलेल्या 50 लोकांच्या नावे पोलिस ठाण्यात सादर करण्याची गरज नाही, असेही त्यांनी नमूद केले. या संदर्भात मंगल कार्यालय, लॉन्समालक, चालक, केटरर्स यापैकी कोणाकडूनही कोणतेही लेखी हमीपत्र घ्यायचे नाही. तसेच लग्न सोहळ्याच्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी कोणतीही शासकीय यंत्रणा येणार नाही, असेही आयुक्तांनी सांगितले. मात्र, सामाजिक अंतर राखण्याबाबत आणि आरोग्याची काळजी घेण्याबाबत राज्य सरकारने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी उपस्थितांना करावी लागेल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. आरोग्य विषयक सर्व नियमांचे पालन करण्याची हमी केटरिंग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी आयुक्तांना दिली. 

महाराष्ट्र केटरिंग असोसिशएन आणि केटरिंग असोसिएशनचे पुणे शहरात 250 पेक्षा जास्त सभासद आहेत. शहरातील सर्व मंगल कार्यालये, लॉन्सचालक, मालक आणि केटरर्स या संघटनांचे सभासद आहेत, अशी माहिती महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार यांनी दिली. यावेळी संजीव वेलणकर, विनय ताटके, अविनाश नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केलेल्या स्पष्टीकरणाबाबत सरपोतदार म्हणाले, ""राज्य सरकारने घातलेल्या अटी पुणे शहराला लागू होणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता लग्न सोहळ्यासाठी बुकींग स्वीकारता येईल. तसेच आयुक्तांनी दिलेल्या माहितीमुळे शासकीय अटींबाबतचा संभ्रम दूर झाला आहे. त्यामुळे आम्ही आयुक्तांचे आभार मानतो. 

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com