

थेऊर, ता. ११ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने थेऊर (ता. हवेली) येथे प्रस्तावित केलेल्या अत्याधुनिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांची भेट घेऊन नागरिकांनी या प्रकल्पास विरोध करून तो रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.
कुंजीरवाडी येथे आयोजित जनता दरबारात हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांच्या नेतृत्वाखाली थेऊरच्या नागरिकांनी आमदारांची भेट घेतली. कचऱ्याचा प्रश्न गंभीर असला तरी स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात घेऊनच प्रकल्पाबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन आमदार कटके यांनी यावेळी दिले. कोणत्याही गावावर अन्याय केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पूर्व हवेलीतील वाढत्या नागरीकरणासाठी पीएमआरडीएने थेऊर येथील १० एकर गायरान जागेवर १३ गावांसाठी हा प्रकल्प मंजूर केला आहे. या प्रकल्पात थेऊर, लोणी काळभाेर, कदमवाकवस्ती, केसनंद, वाडेबोल्हाई, उरुळी कांचन, साष्टे, कोरेगाव मूळ, सोरतापवाडी, आळंदी म्हातोबाची, नायगाव, प्रयागधाम, शिंदवणे, पेठ आणि कोलवडी या गावांचा समावेश आहे. मात्र, ग्रामपंचायतींना कचरा वाहतुकीचा खर्च आणि ‘टिपिंग फी’ भरावी लागणार असल्याने काही माजी सरपंचांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०४३ पर्यंतची गरज ओळखून प्रतिदिन १५० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे. २० किलोमीटर अंतरातील ग्रामपंचायतींनी कचरा संकलित करून प्रकल्प स्थळापर्यंत पोहोचवणे व त्यासाठी निश्चित शुल्क भरणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्ष कार्यवाही सुरू होण्यापूर्वीच स्थानिक विरोधाचे ग्रहण लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.