
भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी ५२ लाखांचे मोबाईल चोरले
पुणे : मोबाईल शॉपीच्या भिंतीला ड्रिल मशिनने भगदाड पाडून चोरट्यांनी ५२ लाखांचे ३०७ मोबाईल चोरी केले. चोरट्यांनी सर्व मोबाईलवरील कव्हर दुकानातच टाकून केवळ मोबाईलवर डल्ला मारला. त्यात आयफोनसह इतर महागड्या मोबाईलचा समावेश आहे. ही घटना शहरातील मध्यवस्तीमध्ये सोमवार पेठेतील खुराणा सेल्समध्ये घडली.
या प्रकरणी मुकेश खुराणा (वय ३९, रा. ताथवडे) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार पेठेतील आगरकर शाळेसमोर खुराणा सेल्स मोबाईल शॉपी आहे. दुकानमालक गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मोबाईल शॉपी बंद करून घरी गेले. त्यानंतर चोरट्यांनी दुकानाच्या मागच्या बाजूने भिंतीला ड्रिल मशिनने भगदाड पाडले. त्यातून दुकानात प्रवेश करून सर्व मोबाईल चोरून नेले.
दुसऱ्या दिवशी सकाळी मोबाईल शॉपी उघडल्यानंतर हा प्रकार समोर आला. घटनेनंतर पोलिस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे, सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर आणि वरिष्ठ निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, वारजे माळवाडी परिसरात भरदिवसा सोन्याचे दुकान अशाच प्रकारे फोडण्यात आले होते. सराफा व्यापारी दुपारी जेवण करण्यासाठी गेल्यानंतर भिंतीला भगदाड पाडून दोन किलो सोने चोरून नेले होते.
Web Title: Thief Broke Wall Stole Mobile Phones Police Seized Cctv Footage Incident Monday
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..