पुणे : म्हणून चोरटा दर सहा महिन्यांनी करायचा नवीन लग्न !

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 October 2019

रात्रीच्यावेळी फिरताना तो "कन्फ्युज' व्हायचा, त्यामुळे रात्रीऐवजी तो दिवसाच चोरी करायचा. मग पोलिसांच्या हाती लागू नये, म्हणून तो अनेक आयडिया लढवायचा. त्यासाठी दर सहा महिन्यांनी तो राहण्याचे ठिकाण बदलायचा, तसेच दर सहा महिन्यांनी तो लग्न करायचा. आत्तापर्यंत या चोरट्याने एक,दोन नव्हे, तर तब्बल सहा वेळा लग्न केले, कारण पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून ! 

पुणे : रात्रीच्यावेळी फिरताना तो "कन्फ्युज' व्हायचा, त्यामुळे रात्रीऐवजी तो दिवसाच चोरी करायचा. मग पोलिसांच्या हाती लागू नये, म्हणून तो अनेक आयडिया लढवायचा. त्यासाठी दर सहा महिन्यांनी तो राहण्याचे ठिकाण बदलायचा, तसेच दर सहा महिन्यांनी तो लग्न करायचा. आत्तापर्यंत या चोरट्याने एक,दोन नव्हे, तर तब्बल सहा वेळा लग्न केले, कारण पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून ! 

कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये मागील वर्षभरापासून घरफोड्यांच्या घटना वाढल्या होत्या. पोलिसांनी घरफोड्या करणाऱ्या गुन्हेगारांच्या कुंडल्या तपासल्या. पण तो चोर काही सापडेना. अखेर पोलिसांनी 250 सीसीटीव्ही चित्रीकरणाची मदत घेतली. त्यामध्ये दिवसा घरफोडी करणाऱ्या एका चोरटा त्यांच्या निदर्शनास आले. सीसीटीव्ही चित्रीकरणाद्वारे 40 किलोमीटरपर्यंत पोलिसांनी त्याचा माग काढला, परंतु ग्रामीण भागात सीसीटीव्ही नसल्याने अडचण निर्माण झाली. त्यानंतर आरोपीच्या वर्णनावरुन दोन वर्षात कारागृहातुन सुटलेल्या 450 आरोपींचे छायाचित्रही तपासले. त्यात 4 आरोपींचे वर्णन जुळले. शेवटी देहूरोड येथील एका आरोपीवर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तो हाती लागत नव्हता. अखेर मोबाईलवरील तांत्रिक विश्‍लेषणाद्वारे त्याचा माग काढून त्यास बेड्या ठोकल्या. निलेश अंकुश काळे (वय 46, रा. देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 

काळे याने शहरात 20 घरफोडीचे गुन्हे केल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्याच्याकडून दहा लाखांची रोकड, 18 लाख 80 हजार रुपये किंमतीचे 47 तोळे सोने असा 28 लाख 80 हजाराचा ऐवज जप्त केला. तर काळे फक्त दिवसा, तेही सकाळच्यावेळी चोरी करायचा. केवळ दहा मिनीटांमध्ये कटावणीच्या सहाय्याने दरवाजा तोडून तो दागिने, रोकड लंपास करीत होता. पोलिस मागे लागू नयेत, म्हणून तो सतत राहण्याची ठिकाणे बदलत होता. त्याचबरोबर दर सहा महिन्यांनी नवीन लग्न करीत होता. त्याच्या प्रत्येक पत्नीला त्याचा हा "व्यावसाय' चांगलाच ठाऊक होता. परंतु त्याच्याकडून मिळणारे पैसे, दागिने भरपुर असल्याने त्यांना फार काही फरक पडत नव्हता. अखेर पोलिसांनी त्यास बेड्या ठोकल्या !


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thief get married every six months in pune