पुणे : चोरटा गेला 'एमएसईबी'च्या पट्ट्या चोरायला अन् बसला शॉक

डी के वळसे-पाटील
बुधवार, 15 जानेवारी 2020

- महावितरण कंपनीच्या वीज उपकेंद्रात तांब्याच्या पट्ट्या चोरणाऱ्या चोरट्याला विजेचा शॉक.

मंचर : महावितरण कंपनीच्या वीज उपकेंद्रात तांब्याच्या पट्ट्या चोरणाऱ्या चोरट्याला विजेचा शॉक लागला. त्यामुळे जखमी झालेला चोरटा अलगदपणे पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. अशोक बाळू पारधी (रा. वाफगाव ता. खेड) असे त्याचे नाव असून, त्याला पुढील उपचारासाठी पोलिसांनी पुण्याच्या ससून रुग्णालयात हलविले आहे. अजून पळून गेलेले तीन ते चार चोरटे असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपळगाव खडकी (ता. आंबेगाव) येथील महावितरण कंपनीच्या 33 केव्ही क्षमतेच्या वीज उपकेंद्रात बुधवारी (ता. १५) पहाटे तांब्याच्या पट्ट्या चोरण्यासाठी पारधी हा आला होता. त्याला विजेचा शॉक लागून गंभीर जखमी झाला. एकूण तांब्याच्या अकरा पट्ट्याची चोरी झाली असून, त्यापैकी 3 पट्ट्या घटनास्थळी मिळालेल्या आहेत. आठ पट्ट्या चोरून नेण्यात चोरटे यशस्वी झाले आहेत. अजून त्याचे दोन तीन साथीदार असण्याची शक्यता मंचर पोलिसांनी व्यक्त केली आहे.

महावितरण कंपनीचे वीज उपकेंद्रातील उपकार्यकारी अभियंता राजेंद्र पाटील यांनी यासंदर्भात मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस हवालदार सागर गायकवाड करत आहेत. आंबेगाव तालुक्यात नदीकाठी असणाऱ्या कृषी पंपाच्या तांब्याच्या तारा यापूर्वी अनेकदा चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे पोलिसांना तांब्याची तारा चोरी करणारी मोठी टोळी मिळण्याची शक्यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thief Injured after Electricity Shock