पुरंदरमध्ये चोरट्यांनी लक्ष्य केले शाळांना

श्रद्धा जोशी
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

पुरंदर तालुक्‍याच्या दक्षिण पूर्व पट्टीतील गावांत गेल्या काही महिन्यांपासून चोरीच्या घटना वाढल्या आहेत. विशेष म्हणजे नीरा, गुळुंचे, पिंपरे या भागात चोरांनी उच्छाद मांडला आहे. सध्या चोरट्यांनी आपला मोर्चा प्राथमिक व माध्यमिक शाळांकडे वळविला असून ई लर्निंग साहित्याच्या चोऱ्या होऊ लागल्या आहेत. चोरांना पकडून त्यांच्या मुसक्‍या आवळण्याचे कडवे आव्हान पुरंदरच्या पोलिस प्रशासनासमोर आहे.

गुळुंचे (पुणे) : पुरंदर तालुक्‍याच्या दक्षिण पूर्व पट्टीतील गावांत गेल्या काही महिन्यांपासून चोरीच्या घटना वाढल्या आहेत. विशेष म्हणजे नीरा, गुळुंचे, पिंपरे या भागात चोरांनी उच्छाद मांडला आहे. सध्या चोरट्यांनी आपला मोर्चा प्राथमिक व माध्यमिक शाळांकडे वळविला असून ई लर्निंग साहित्याच्या चोऱ्या होऊ लागल्या आहेत. चोरांना पकडून त्यांच्या मुसक्‍या आवळण्याचे कडवे आव्हान पुरंदरच्या पोलिस प्रशासनासमोर आहे.

थोपटेवाडी येथील असेंड इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील 12 संगणक व इतर ई लर्निंगशी संबंधित दोन लाखांचे साहित्य घेऊन रविवारी (ता. 1) मध्यरात्री चोरट्यांनी पोबारा केला. त्यामुळे प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही महिन्यांपूर्वी पिंपरे येथील प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्यांची कुलपे तोडून चोरट्यांनी ई लर्निंगचे साहित्य घेऊन पोबारा केला. नीरेच्या बंद असलेल्या प्राथमिक शाळेवरही चोरट्यांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तेथे किमती साहित्य न आढळल्याने त्यांनी काढता पाय घेतला. चोरांचा तपास करून त्यांच्या मुसक्‍या आवळण्यात पोलिसांना अपयश आले आहे.

एकीकडे चौदाव्या वित्त आयोगातील ठराविक निधी शाळांच्या सुविधांसाठी खर्च करणे ग्रामपंचायतींना सरकारने बंधनकारक केले आहे. त्यामुळे साहजिकच खेडोपाडी शाळांतून अँड्रॉइड टीव्ही, संगणक, प्रोजेक्‍टर नव्याने आले आहेत. खासगी शाळांत संस्था चालकांनी ई लर्निंग सुविधा तयार केल्या आहेत. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, शाळा सिद्धी, ज्ञानरचनावादी साहित्य निर्मिती व अध्यापन यामुळे शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल होत असून शाळा विकासाच्या दिशेने टेक ऑफ करताना पाहायला मिळत आहेत. परंतु, शाळांतील महागडे साहित्यच चोरीला जात असल्याने ई-साहित्याला चोरट्यांचे ग्रहण लागलेले पाहायला मिळत आहे.
नीरा व परिसरात घरफोड्यांचे प्रमाणही वाढत आहे. सध्या शाळांतून सुरू असलेल्या चोऱ्या हा चर्चेचा विषय झाला आहे. ई साहित्य चोरणारी तसेच घरांची कुलपे तोडून रोख रक्कम व दागिने लांबविणाऱ्या टोळ्या वेगवेगळ्या असण्याची शक्‍यता व्यक्त केली जात असली तरी चोरांना गजाआड करणे आवश्‍यक आहे.

जेजुरी पोलिसांकडून तसेच भोर उपविभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत असून रात्रगस्तही सुरू आहे. घटना घडल्यानंतर त्याठिकाणी तज्ज्ञ बोलावून पाहणीही केली जाते. परंतु, नंतर चोरट्यांचा तपास लागत नाही, अशी स्थिती आहे. नीरेत घडलेल्या काही चोऱ्यांच्या घटनेतील आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे.

गुळुंचे येथे झालेल्या दरोडा प्रकरणातील मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. परंतु, शाळांतील चोऱ्या रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे आव्हान पोलिसांपुढे नव्याने उभे राहिले आहे. आता चोरट्यांच्या मुसक्‍या आवळण्याची मागणी स्थानिक, शिक्षक, पालक यांच्यातून होऊ लागली असून यावर पोलिस काय कार्यवाही करतात हे आगामी काळात पाहायला मिळेल.

2015च्या तुलनेत सध्या चोऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. रात्रगस्त, पोलिस पहारा तसेच जनजागृतीच्या माध्यमातून पोलिस काम करत आहेत. नीरेत झालेल्या चोऱ्यांतील आरोपी निष्पन्न झाले असून मुद्देमाल हस्तगत केला आहे. नागरिकांनी सतर्कता राखणे गरजेचे आहे.
- अंकुश माने, साहाय्यक पोलिस निरीक्षक, जेजुरी

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thief Target Primary School